महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मोकाट फिरणारी जनावरे पकडण्याची मोहीम राबविणेत येणार- ओमप्रकाश दिवटे
इचलकरंजी:
इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. याबाबत शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांचे कडून तीव्र स्वरूपाच्या तक्रारी महानगर पालिकेकडे येत आहेत. मोकाट जनावरे नागरिकांचे अंगावर जाणे, जखमी करणे, वाहनांचे आडवे येणे यामुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने या बाबीची दखल घेऊन महानगरपालिकेने कडून शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याच बरोबर शहरातील मोकाट फिरणाऱ्या गाई, घोडे, गाढव तसेच मोकाट डुक्करांचा उपद्रव वाढत असल्याने महानगर पालिकेच्या वतीने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविणेचे नियोजन केले आहे. सदरची मोकाट जनावरे पकडुन संबधीत जनावरांचे मालक आढळून आल्यास दंडात्मक आकारणी सह प्रशासकीय शुल्क म्हणून सदर जनावरांना महानगरपालिकेकडून करणेत येणारा चारा, पाणी व इतर सर्व बाबींचा खर्च संबंधित जनावरांच्या मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. तसेच अशी जनावरे घेऊन जाणाऱ्या मालकांच्या सोबत त्यांच्या जनावरांचे फोटो काढून सोशल मीडिया वरून नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले जातील .
या अनुषंगाने उद्या दि.५ फेब्रुवारी पासून तीन दिवसांत संबंधित मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकाट न सोडता त्यांना बांधून ठेवण्याची व्यवस्था करावी अन्यथा सदर मुदतीनंतर महानगरपालिका प्रशासनाकडुन शहरांमध्ये फिरणारी मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
सदर मोहीम राबविताना संबंधीत मालकांनी अथवा इतर कोणीही या मोहिमेत अडथळा आणल्यास सदर व्यक्ती विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असा इशारा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.
यापूर्वीच्या मोहिमा लांडगा आला रे आला-
यापूर्वी महापालिकेने अतिक्रमण असो वा मोकाट जनावरे पकडण्याच्या मोहिमा या कागदोपत्री राबवल्या असून लांडगा आला रे आला याप्रमाणे घोषणा करायच्या आणि राजकीय दबावापुढे लोटांगण घालण्याची भूमिका प्रशासनाची राहिली आहे.त्यामुळे आयुक्त आपल्या कार्यकालाच्या अखेरच्या टप्प्यात तरी निर्णायक भूमिका घेणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800