द.भा. जैन सभेची पदवीधर संघटनातर्फे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर
इचलकरंजी:
दक्षिण भारत जैन सभेची पदवीधर संघटना यांच्या वतीने गत पाच दशकांपासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, औद्योगिक, धार्मिक क्षेत्रात केलेले आदर्श कार्य लक्षात घेऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना स्व. वसंत भिमगोंडा पाटील कोथळीकर जीवन गौरव पुरस्कार आणि जैन साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल स्व. प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना डॉ. ए.एन. उपाध्ये जैन साहित्य निर्मिती व संशोधन पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती पदवीधर संघटनेचे चेअरमन प्रा. ए. ए. मुडलगी यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा पुरस्कार प्रदान सोहळा रविवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात संपन्न होणार आहे.
ते म्हणाले, पदवीधर संघटना ही दक्षिण भारत जैन सभेची बौध्दिक व शैक्षणिक चळवळ म्हणून काम करते आहे. संघटनेच्या वतीने अनेक शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर विविध क्षेत्रात समाजोपयोगी कार्य करणार्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात येतो. यंदाच्या स्व. वसंत भिमगोंडा पाटील-कोथळीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांची निवड करण्यात आली आहे. तर जैन साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल स्व. प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना मरणोत्तर डॉ. ए.एन. उपाध्ये जैन साहित्य निर्मिती व संशोधन पुरस्कार देण्यात येणार आहे. यानिमित्ताने पदवीधर संघटनेचा ३५ वा वर्धापनदिन व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्षस्थान दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील भूषविणार आहेत. तर माजी कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन पदवीधर संघटनेचे संस्थापक आर. पी. पाटील-सिदनाळकर यांचे हस्ते होणार आहे. पत्रकार परिषदेत पदवीधर संघटनेचे व्हा. चेअरमन प्रा. डी. डी. मंडपे, सेक्रेटरी प्रा. ए. ए. मासूले, जॉ. सेक्रेटरी प्रा. वी. वी. शेंडगे, प्रा. डी. ए. पाटील, सन्मती बँकेचे चेअरमन सुनील पाटील उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800