इचलकरंजीत सूतमाल खरेदीच्या नावाखाली १.२१ कोटींची आर्थिक फसवणूक,७ जणांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी:
सुतमाल खरेदीसाठी दिलेल्या आगाऊ रक्कमेची परतफेड न केल्याने स्थानिक व्यापाऱ्याची १ कोटी २१ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद मनीषकुमार कैलाशचंद्र धुत (रा. इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे.
मयूर इंडस्ट्रिज आणि त्याच्या संबंधित व्यक्तींनी विश्वास संपादन करून गंडा घातल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहितीवरून व पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार, धुत दांपत्याचा क्रिशव फॅबटॅक्स नावाने सूतमाल विक्रीचा व्यवसाय आहे.२०२२ मध्ये त्यांच्या ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात ३२ सिंगल कार्डेड कॉटन यार्न जोतिर्मय सूतमाल आवश्यक होता. त्यावेळी मयूर इंडस्ट्रिजचे मयूर पंकज अग्रवाल, पंकज पुष्पक अग्रवाल, पियुष पंकज अग्रवाल, प्रविण पुष्पक अग्रवाल आणि इतर संबंधित व्यक्तींनी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्टॉक उपलब्ध असल्याचे सांगितले.त्यानुसार, नोव्हेंबर २०२२ मध्ये दोन्ही पक्षांमध्ये व्यवहार ठरला. मयूर इंडस्ट्रिजने प्रोफॉर्मा इनव्हॉईस जारी करून १.२७ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम मागितली. क्रिशव फॅबटॅक्सने ICICI बँकेच्या खात्यातून RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर केले. मात्र, ठरलेल्या मुदतीत संपूर्ण माल मिळाला नाही. सुरुवातीला ५.५६ लाख रुपयांचा माल देऊन उर्वरित माल थकवण्यात आला.
धुत यांनी वारंवार मागणी केली, तेव्हा बाजारातील दरवाढीचे कारण सांगत फसवणूक करणाऱ्यांनी वेळकाढूपणा सुरू केला. त्यानंतर काही काळाने त्यांनी तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
फसवणुकीची जाणीव होताच मनीषकुमार धुत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
आरोपी पंकज व पियुष अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले असून पियुष अग्रवाल तब्बेतीच्या त्रासाने इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार घेत आहे. पंकज अग्रवाल याला न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.इतर आरोपी फरार असून पुढील तपास सपोनि वायदंडे करत आहेत.
संशयित पंकज अग्रवाल याला न्यायालयात नेताना पोलीस

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800