इचलकरंजी महापालिकेतील सफाई कर्मचारी त्रस्त – रजा मंजुरीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप.
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी आरोग्य विभागाच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झाले आहेत. शासनाने दिलेल्या हक्काच्या रजा मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून आर्थिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे.
रजा मंजुरीसाठी पैशांची मागणी केली जात असून याबाबत ठरलेले ‘दर’ आकारले जात असल्याचा आरोप करताना महापालिकेच्या वार्ड क्रमांक १ ते २५ मध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मान्य केलेल्या अर्जित रजा, मेडिकल रजा, खाडी रजा आणि किरकोळ पगारी रजा यांसाठी आरोग्य विभागाकडून पैसे उकळले जातात.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोपानुसार, रजा मंजूर करण्यासाठी ठराविक पैसे द्यावे लागतात.मेडिकल रजा (१० ते २० दिवस) – ₹३,०००/-, अर्जित रजा (१० ते २० दिवस) – २,०००/-,खाडी रजा (१ महिना ते २ महिने) – ५,०००/-पर्यायी रजा ३००/- ते ५००/- असे दर ठरलेले असून रजा मंजुरीसाठी मुकादम, स्वच्छता निरीक्षक,मुख्य स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य अधिकारी यांची शिफारस घेणे बंधनकारक आहे. मात्र,काही कर्मचारी कमी शिक्षित असल्याने ऑफिसमधील कामकाज सांभाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडूनच पैसे उकळले जातात. यामध्ये सिंधू कांबळे, ऋतुजा कांबळे, उमेश कांबळे, खेमचंद लालबेग,गंगाधर पाटील, राजू पवार,वसंत साळुंखे आणि संजय माने यांची नावे तक्रारीत टाकण्यात आली आहेत.
सफाई कर्मचाऱ्यांच्या मते त्यांचे कार्य हे शहरातील नागरिकांचे आरोग्य जपण्याचे आहे.अनेकदा गंभीर आजार जडतात,काहींना जीवही गमवावा लागतो.पण,त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही.”रजा मंजुरीच्या नावाखाली पैशांची मागणी केली जाते. आम्ही स्वतःवर कर्जाचा डोंगर घेऊनही या अधिकाऱ्यांचे पोट भरतो.पण जर पैसे दिले नाहीत, तर आमच्यावर मानसिक दबाव टाकला जातो, धमक्या दिल्या जातात. काहींना जबरदस्तीने बदल्या केल्या जातात,” असा आरोप त्यांनी केला.
याबाबत आरोग्य अधिकारी सुनीलदत्त संगेवार यांच्यावर सफाई कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, ते स्वतःला आयुक्त समजून हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतात.”आम्हाला नोकरीच्या भीतीपोटी आवाज उठवता येत नाही, याचा गैरफायदा हे अधिकारी घेत आहेत. दिवसेंदिवस पैशांची मागणी वाढत आहे,आम्ही खचून जात आहोत,” असे निवेदनात म्हटले आहे.
सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले की, रजेच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आरोग्य विभागातील भ्रष्टाचार थांबवला गेला पाहिजे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय,कोल्हापूर,अति. आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका दोन्ही उपायुक्त, महानगरपालिका कामगार अधिकारी तथा प्र. सहा. आयुक्त,सर्व कामगार संघटना, इचलकरंजी, इचलकरंजी नागरिक मंच यांना देण्यात आल्या आहेत.निवेदनावर १०० कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800