इचलकरंजी फेस्टिव्हल शिस्तबद्ध भरणार, परिसरातील गर्दी टाळण्यासाठी धोरण ठरले
इचलकरंजी :
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह परिसर (व्यंकोबा मैदान) येथे पाळणे, खेळणी, खाद्यपदार्थ व हातगाडी विक्रेते यांचे स्टॉल लावले जातात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असून जवळच असलेल्या हॉस्पिटल व शाळांमुळे रुग्ण, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर मा. अति. आयुक्त सुषमा शिंदे (कोल्हे) यांच्या दालनात, मा. आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीस मा. उपायुक्त अशोक कुंभार, सहायक आयुक्त विजय राजापुरे, सहायक आयुक्त विद्या कदम, नगर अभियंता महेंद्र क्षीरसागर,शहर अभियंता डॉ.बाजी कांबळे, मिळकत पर्यवेक्षक श्रीकांत पाटील यांच्यासह माजी नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत DKTE (सेवा भारती) कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणारा मोठा आकाशपाळणा अन्यत्र हलविणे,पोस्ट ऑफिस ते गणेश मंदिर या रस्त्याच्या एका बाजूला स्टॉल लावण्यास परवानगी; दुसरी बाजू रहदारीसाठी मोकळी ठेवणे,मंगलधाम कंपाऊंड लगतच्या रस्त्याच्या एका बाजूला स्टॉल लावण्यास परवानगी,व्यंकोबा मैदान प्रवेशद्वार ते शाळा क्रमांक ८ व श्रीमंत ना. बा. घोरपडे पुतळा ते पूर्व बाजू स्टॉल लावण्यास परवानगी,गुरुकृपा खानावळ ते व्यंकोबा मैदान जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्टॉल लावण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.सदर निर्णय सर्वानुमते घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याचे धोरण ठरविण्यात आले. बैठकीच्या शेवटी मा. अति. आयुक्त यांनी सर्वांचे आभार मानून बैठक संपन्न झाल्याचे सांगितले.
निर्णयाची अंमलबजावणी आवश्यक.
यापूर्वीही दीपावली बाजार तसेच इतर अतिक्रमण याबाबत बरेच निर्णय घेण्यात आले पण ऐनवेळी राजकीय दबावामुळे प्रशासनास हतबल व्हावे लागले असा पूर्वानुभव असल्याने घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार का हे येत्या काळात बघावे लागेल.
बैठकीत आ.राहुल आवाडे,अति आयुक्त सुषमा शिंदे व उपस्थित अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







