ICHMH51NEWS.IN
9921600800

रोज थोडे चांगले बनण्याचा प्रयत्न करा,कर्मावर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवल्यास यशाला गवसणी. “वेध भरारीचे” – प्रशांत बोरा यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोज थोडे चांगले बनण्याचा प्रयत्न करा,कर्मावर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवल्यास यशाला गवसणी.

“वेध भरारीचे” – प्रशांत बोरा यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

इचलकरंजी :
रोज थोडे चांगले बनण्याचा प्रयत्न करा,आपल्या कर्मावर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवा यश तुमचेच आहे,मोठा विचार करा असे मत बोरा मल्टिकॉर्पचे संस्थापक श्री. प्रशांत प्रकाशजी बोरा यांचे “वेध भरारीचे” या उत्साहवर्धक व प्रेरणादायी व्याख्यानात व्यक्त केले. इचलकरंजी येथे उत्स्फूर्त वातावरणात पार पडलेल्या व्याख्यानास मोठया प्रमाणत व्यावसायिक उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात त्यांनी आंतरराष्ट्रीय उद्योगविश्वातील अनुभव, व्यवसायातील संघर्ष व अडथळ्यांवर मात करण्यासाठी घेतलेल्या शिकवणी अत्यंत सहज आणि प्रभावी पद्धतीने मांडल्या.
“मोठे स्वप्न पाहायला घाबरू नका व बाहेरील टीकेला कधीही बळी पडू नका,” असा ठाम संदेश त्यांनी दिला. यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून, उत्तम माणूस असणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ते पुढे म्हणाले, “सरकारी कर वेळेवर भरणे व प्रामाणिकपणे व्यवसाय करणे हे यशाचे गमक आहे. यासाठी ‘गुडनेस क्वोशंट’ (Goodness Quotient) विकसित करणे आवश्यक आहे.”
आजच्या काळात स्पर्धेपेक्षा सहयोगाची गरज अधिक असून, सहयोगातूनच उद्योगवृद्धी साध्य होईल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
उद्योजकांनी उत्कटता, ऊर्जा, भावनिक समज (Emotional Acumen) तसेच आर्थिक शहाणपण (Financial Acumen) या चार मूलभूत गुणांचा अंगीकार करावा, असा उपदेश त्यांनी केला. मराठी माध्यमातून शिक्षण घेतले तरी ते अडथळा न ठरता आत्मविश्वास वाढविणारे ठरले, असे सांगून त्यांनी तरुणांना उभारी दिली. त्यांच्या मनोगताने उपस्थितांना नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त झाली.
या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, जितो इचलकरंजी, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व महेश क्लब ऑफ इचलकरंजी या संस्थांनी संयुक्तपणे केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महेश क्लब अध्यक्ष ओमप्रकाश चांडक व जितो अध्यक्ष महावीर बागरेचा यांनी केले. रोटरी अध्यक्ष रो. संजय घायतिडक यांनी प्रास्ताविक तर श्री. मुकेश पुनमिया यांनी कार्यक्रमाचे उद्देश व महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शनजी बंग यांनी केले तर आभार प्रदर्शन लिंगराज कित्तुरे यांनी केले. यावेळी महेश क्लब सेक्रेटरी सतीश काबरा, रोटरी सेक्रेटरी पिरगोंडा पाटील, लायन्स सेक्रेटरी सचिन येलाजा, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोज १ टक्के चांगले बना-रोज १ टक्के चांगले बना सुधारणा करा त्याचा मोठा उपयोग आयुष्यात होईल,२००४ ला इचलकरंजीतुन पुण्याला गेल्यानंतर वॉटर प्युरीफायर पासून व्यवसायची सुरवात केली,त्यानंतर मोबाईल डिजाईन करून हँडसेट बनवले तो व्यवसाय २०१३ ला बंद केल्यावर सगळे संपल्यासारखे वाटले पण मोठया इच्छाशक्तीच्या जोरावर परत भरारी घेत आज ७००० कोटीची उलाढाल केली आहे, आपल्या माणसांना मोठे करण्याचे तंत्र अवलंबल्याने हे यश मिळाले आहे.

प्रशांत बोरा

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना प्रशांत बोरा व आयोजक संस्था प्रतिनिधी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा