इचलकरंजीतील बी.के.गॅंग एक वर्षासाठी हद्दपार
इचलकरंजी –
इचलकरंजी परिसरातील कुख्यात “बी.के. गॅंग” या संघटित गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई करत टोळी प्रमुखासह तब्बल १३ जणांना एक वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि समाजहितास बाधक ठरणाऱ्या अवैध कृत्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मा. योगेश कुमार सारे, पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी सर्व पोलीस ठाण्यांना हद्दपारी व एमपीडीए कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाण्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५५ अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता.
सदर सुनावणीदरम्यान टोळीच्या बेकायदेशीर हालचालींमुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याचे तसेच समाजामध्ये दहशत पसरवल्याचे निष्पन्न झाले. यामुळे हद्दपारी प्राधिकाऱ्यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बी.के. गॅंग प्रमुख राजकुमार उर्फ बच्चन कांबळे (रा. सहकारनगर, इचलकरंजी) याच्यासह एकूण १३ जणांना कोल्हापूर जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचा आदेश दिला.
सदर आदेशाची बजावणी इचलकरंजी पोलीस ठाण्याकडून करण्यात आली आहे. हद्दपार आरोपी जिल्ह्यात आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याला किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३१-२६६२३३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







