संगम युवक मंडळाच्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद
शिरढोण, दि. १ (प्रतिनिधी) सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या संगम युवक मंडळ, शिरढोण (ता. शिरोळ) यांच्यावतीने गणेशोतसवानिमीत्त झालेल्या रक्तदान शिबीरात ५२ दात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबीरात ९ महिलांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत इतर महिलांसमोर आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान मंडळाच्यावतीने आयोजित महाप्रसादाचा ग्रामस्थांनी लाभ घेतला.
गावातील सर्वधर्मीय युवकांना एकत्र करून १९९२ मध्ये संगम युवक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्यावतीने दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. याचबरोबर धार्मिक, सामाजिक परंपरा जपण्यासाठीही मंडळ सदैव तत्पर असते. गावात अनेक मंडळं असली तरी संगम मंडळाने सर्वधर्मसमभाव ठेवून प्रत्येकाला मंडळात आदराचे स्थान दिल्याने मंडळाबद्दल सर्वाना आपुलकी वाटते. मंडळाने आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वत: चांगले कार्य केल्याने कुरूंदवाड पोलीस ठाणे आणि लायन्स क्लबच्यावतीने तीनवेळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
यावर्षी मंडळाने गणेशोत्सवानिमीत्त आकर्षक श्रींची मुर्ती प्रतिष्ठापना केली असून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत. त्याचाच भाग म्हणून सालाबादाप्रमाणे रक्तदान शिबीर घेण्यात आले. सरपंच सागर भंडारे, डॉ. संदिप नागणे, डॉ. उदय सुर्यवंशी, डॉ. कुमार पाटील, डॉ. सुहास कांबळे, डॉ. सचिन पाणदारे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबीराला प्रारंभ झाला. दिवसभरात तब्बल ५२ दात्यांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष शांतीनाथ शंंभुशेटे, उपाध्यक्ष चंद्रकांत मालगावे, खजिनदार श्रीधर गेबीसे, सचिव दादासो न्हावी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान मंडळाच्यावतीने झालेल्या महाप्रसादाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिराप्रसंगीचे छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







