हद्दपार आरोपीकडून तरुणावर जीवघेणा हल्ला
इचलकरंजी (प्रतिनिधी):
शहरातील बजाज फायनान्स समोर, कामगार चाळ येथे एका हद्दपार आरोपीकडून तरुणावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निखिल नितीन घाडगे (वय २५, रा. साईनाथनगर, इचलकरंजी) यांच्यावर आशादुल्ला हारुण जमादार (वय २७, रा. भोने माळ, इचलकरंजी) या तरुणाने हल्ला केल्याचे समजते. आरोपीला यापूर्वी मा. पोलीस अधीक्षक कोल्हापुर यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले होते. तरीही त्याने आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात प्रवेश केला.
घटनेत फिर्यादीने आरोपीस मोटारसायकल न दिल्याच्या कारणावरून आरोपीने संतापून “तुला जिवंत ठेवत नाही” असे म्हणून हातातील लोखंडी चौकोनी पाईपने डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड व पो.नि. दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोसई भोस्कर करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







