सेवा पंधरवडा अभियान “समर्पित भावनेने काम करा”- जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर (ता.१७) – “सेवा पंधरवडा” या विशेष उपक्रमामध्ये सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत सामान्य जनतेपर्यंत अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान सेवा पोहोचविण्यासाठी हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.१७ सप्टेंबर) होऊन समारोप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी (दि.२ ऑक्टोबर) होणार आहे. अभियानात “पाणंद रस्तेविषयक मोहीम”, “सर्वांसाठी घरे योजना”, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे.
या काळात गावनिहाय पाणंद रस्त्यांची यादी तयार करणे, ग्रामसभा घेऊन त्यांची अंतिम रूपरेषा ठरवणे, भूमिअभिलेख विभागाकडून सिमांकन, अतिक्रमण निर्मूलन, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे, पुनर्विलोकन व फेरफार अदालत, भटक्या-विमुक्त जातींसाठी शिबिरे, प्लॅस्टीकमुक्तीबाबत निबंध व पथनाट्य स्पर्धा, “सर्वांसाठी घरे” उपक्रमांतर्गत अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप, किल्ले पन्हाळगड येथे चित्रकला स्पर्धा, जिल्हास्तरीय नशामुक्ती रॅली, प्रलंबित माहिती अधिकार अर्जांची निर्गती व सेवा हमी कायद्यावरील माहितीपर कार्यक्रम, आपले सरकार सेवा केंद्र व तलाठी कार्यालयाचे गुगल नकाशावर लोकेशन निश्चित करणे, चौकशी प्रकरणांची निर्गती अशा विविध उपक्रमांचे आयोजन होणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, भूमिअभिलेख अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेऊन अभियानाची रूपरेषा निश्चित केली. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी-विद्यमान आमदार-खासदार, विविध संस्था, पत्रकार, युवक व नागरिकांचा सक्रीय सहभाग राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय तेली यांनी सांगितले की, “संपूर्ण अभियान प्रभावीपणे पार पाडून कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील.”
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







