जवाहर साखर कारखान्याच्या ३६ व्या वार्षिक सभेत एआय तंत्रज्ञानाचा वापराचा संकल्प, शेतकऱ्यांना एकरी १० ते २० टन उत्पादनवाढीचे लक्ष
इचलकरंजी:
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट शेतामध्ये आधुनिक एआय (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी १० ते २० टन उत्पादन वाढविण्याचा संकल्प जवाहर साखर कारखान्याने केला असून ऊस पाठविणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी देण्याची घोषणा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली. हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळी संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
Advt
सभेला मार्गदर्शन करताना प्रकाश आवाडे म्हणाले की गतसाली कारखाना उशिरा सुरू झाल्याने ऊस कर्नाटकातील कारखान्यांकडे गेला आणि परिणामी ऊसक्षेत्रात घट होऊन कारखान्याला नुकसानीचा सामना करावा लागला. यावर मात करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट व बारामती केव्हीकेच्या मदतीने एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढविण्याच्या योजना राबवल्या जातील. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत थेट सेवा पोहोचविणे, ड्रोनद्वारे औषध फवारणी, ऊस विकास योजना आणि एआयच्या सहाय्याने उत्पादनवाढ हे कारखान्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेत निमशिरगाव येथील रत्नाप्पाण्णा कुंभार धडक पाणीपुरवठा योजना कारखान्याच्या वतीने चालविण्यासाठी घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले तर सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले आणि आभार व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले यांनी मानले.
या वेळी आमदार राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, उत्तम आवाडे, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, माजी संचालक व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी प्रास्ताविक करताना जुना इतिहास, कारखान्याच्या उभारणीची कहाणी व आजवरचा प्रवास याचा आढावा घेतला. वयाच्या ९४ व्या वर्षीही त्यांची बोलण्याची शैली, आठवणींना उजाळा आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. त्यांनी जिद्द, चिकाटी आणि सर्वांच्या सहकार्यामुळे जवाहर कारखाना आज नावारूपाला आल्याचे सांगितले. त्यांचे भाषण संपताच उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
सभेत बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे,
व्यासपीठावर कल्लाप्पाणा आवाडे,प्रकाश आवाडे,आ.राहुल आवाडे,स्वप्निल आवाडे.बाबासाहेब चौगुले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








