इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानांतर्गत भव्य महिला आरोग्य शिबिराचे उद्घाटन
इचलकरंजी –
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या विशेष अभियानांतर्गत इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात भव्य महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी आमदार डॉ. आवाडे यांनी महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे मूळ केंद्र असल्याचे सांगत या अभियानाचे महत्त्व पटवून दिले. कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी या उपक्रमामुळे महिला व बालकांच्या आरोग्य संरक्षणास मोठी मदत होणार असल्याचे नमूद केले.
Advt
शिबिरात महिला रुग्णांची उच्च रक्तदाब, मधुमेह निदान तपासणी, आभा कार्ड नोंदणी, किशोरवयीन मुलींची रक्तक्षय तपासणी व समुपदेशन, मासिक पाळी स्वच्छता, पोषण मार्गदर्शन, एचपीव्ही लसीकरणाबाबत माहिती, कर्करोग निदान तपासणी आदी सेवा देण्यात आल्या. तसेच महानगरपालिका शाळांतील महिला शिक्षक-कर्मचारी व पोलीस महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी करून औषधोपचारही करण्यात आले.
रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ यांनी रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा सादर केला. रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी महिला आरोग्याविषयी संदेश देणारे पथनाट्य सादर केले. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त २२ सप्टेंबर रोजी रुग्णालयात जन्मलेल्या बालिकांना भाजप ओबीसी अध्यक्ष संजय हनबर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
या कार्यक्रमास विभागीय नोडल ऑफिसर डॉ. हेमलता पालेकर, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, नोडल अधिकारी डॉ. रुपाली भाट, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील, अधिसेविका चारुशिल्पा येमल, सहा. अधिसेविका सीमा कदम, आमदार प्रतिनिधी कपिल शेटके, रुग्ण कल्याण समिती सदस्य विजय पाटील, माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेखा काटे यांनी केले तर डॉ. प्रकाश मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








