निसर्ग शेती व रानभाज्यांचे संवर्धन आवश्यक – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असून येथील जैवविविधता पर्यावरणाच्या दृष्टीनेच नव्हे तर मानवी आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. जिल्ह्यातील हवामान विविध प्रकारच्या रानभाज्या उगवण्यासाठी पोषक असून या भाज्यांमध्ये मानवी आरोग्यास आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे आजारपण कमी होण्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी रानभाज्यांचा व निसर्ग शेतीचा प्रसार आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
ते एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर, निसर्ग अंकुर संस्था, इकोस्वास्थ आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादन प्रदर्शन’ उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पश्चिम महाराष्ट्रातील जंगल आणि डोंगर परिसरात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्या पौष्टिक व औषधी गुणांनी युक्त आहेत. या भाज्यांचे संवर्धन आणि प्रसार झाल्यास ग्रामिण भागात आरोग्यदायी आहार संस्कृती रुजेल. सरकार यासाठी आवश्यक सहकार्य देईल, असेही त्यांनी सांगितले.
Advt
या प्रदर्शनात २०० हून अधिक रानभाज्या व सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले असून ते ४ आणि ५ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, साईक्स एक्स्टेंशन, टाकाळा, कोल्हापूर येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत भरवण्यात आले आहे. एनजीओ कंपॅशन २४ आणि कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी सांगितले की, या प्रदर्शनाचा उद्देश म्हणजे दुर्मिळ रानभाज्यांची ओळख, त्यांचा आहारात समावेश व शेतकऱ्यांनी त्यांच्या लागवडीकडे वळावे हा आहे.
प्रदर्शनात गारंबी, टेटू, खाजकुहीली, शेरणी, कांड्याचित्रक, गाजरीची भाजी, खरशिंग शेंगा, अमरकंद, समुद्रशोक, जैताळू, खडक अंबाडी, समुद्रशिंगी, रुकाळू, बाफेली, करटोली, कुडा, बांबू कोंब, अंबाडा, सुरण, भुई आवळी, भारंगी यांसारख्या दुर्मिळ रानभाज्या पाहायला मिळत आहेत. या भाज्यांचे बियाणे आणि कुंड्यांतील रोपेही प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध असून याचे मार्गदर्शन वनस्पती तज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी केले.
निसर्ग अंकुर संस्थेच्या वतीने रानभाज्यांपासून बनवलेले खाद्यपदार्थ चाखण्यासाठी खास स्टॉल्स ठेवले आहेत. प्रदर्शनात एकूण ३५ स्टॉल्स असून त्यामध्ये सेंद्रिय गूळ, मध, भाजीपाला, धान्य, हर्बल औषधे, कंपोस्ट व गांडूळ खत, डीहायड्रेटेड पावडर, सेंद्रिय बी-बियाणे इत्यादींचा समावेश आहे. रविवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता महिलांसाठी ‘रानभाज्यांची पाककृती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सौ. मंजिरी कपडेकर – ९३७३३१९४९५ आणि ऐश्वर्या जामसंडेकर – ७६२०६१९४९५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
एनजीओ कंपॅशन २४ आणि वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी सांगितले की, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या रानभाज्यांची माहिती आणि सेंद्रिय उत्पादनांची जाण नागरिकांनी करून घेतल्यास सुदृढ पिढी घडेल. विद्यार्थी, महिला आणि सर्व नागरिकांनी या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून पहिल्याच दिवशी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला मोठी गर्दी केली होती.
या उपक्रमाला चॅनल बी मीडिया पार्टनर असून गार्डन क्लब कोल्हापूर, मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस, युथ अॅनेक्स, वुई केअर हेल्पलाईन, डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय (मलकापूर), सार्थ, व्ही. टी. पाटील फाउंडेशन, सिद्धगिरी नर्सरी आणि अवनी संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या प्रसंगी डॉ. मधुकर बाचुळकर, डॉ. दिलीप माळी, प्राजक्ता चरणे, भूषण पाटील, मंजिरी कपडेकर, हरीश सायवे, शरद आजगेकर, अनुराधा भोसले, मोहन माने, अभिजित पाटील, अमृता वासुदेवन, कविता घाटगे, जितेंद्र शाह, संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








