सूत दरवाढ आणि भेसळीविरोधात कारवाई करा – विनय महाजन यांचा संतप्त इशारा
इचलकरंजी :
सूत गिरण्या आणि सूत व्यापाऱ्यांकडून सुरू असलेल्या मनमानी दरवाढीबरोबरच सूत भेसळीचे वाढते प्रमाण याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केली आहे.
महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका–इस्राईल विरुद्ध इराण या संघर्षाच्या पार्श्वभूमीचा आधार घेत सूत गिरण्या व व्यापाऱ्यांनी सूत दरात अनियंत्रित वाढ सुरू केली आहे. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्यांना कापसाच्या दरात तुलनात्मक वाढ मिळत नसल्याने ही वाढ अन्यायकारक ठरत आहे. कापूस दरातील वाढीच्या चौपट ते पाचपट दराने सूत महाग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, या संकटाच्या काळात काही ठिकाणी सूत भेसळीचे प्रमाणही वाढल्याचे निदर्शनास येत असून, यामुळे यंत्रमागधारकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर ज्या पद्धतीने नियंत्रण ठेवले जाते, त्याचप्रमाणे सूत दर व गुणवत्तेवरही प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.
दरम्यान, सूत दरवाढ आणि भेसळीवर तातडीने आळा घातला नाही, तर यंत्रमागधारक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







