ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत टेक्स्टाईल एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर; देशातील सहा शहरांमध्ये निवड,आज कार्यक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत टेक्स्टाईल एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर; देशातील सहा शहरांमध्ये निवड,आज कार्यक्रम

इचलकरंजी :
 कापड उद्योगाला अधिक निर्यातक्षम बनवण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत देशात सहा ठिकाणी पथदर्शी प्रकल्प म्हणून टेक्स्टाईल एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर (TEFC) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सहा शहरांमध्ये लुधियाना, करूर, सुरत, जयपूर, वाराणसी यांच्यासह इचलकरंजीचा समावेश करण्यात आला आहे.
इचलकरंजी येथे सुरू होणाऱ्या या सेंटरमुळे शहरातील कापड व गारमेंट उद्योगातून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीला मोठे प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती टेक्स्टाईल कमिटी इचलकरंजीचे कार्यालय प्रमुख शिवराज मार्गम यांनी दिली.
केंद्र सरकारने देशातील विविध भागांत तयार होणाऱ्या वस्त्र उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी प्रत्येक सेंटरला विशिष्ट उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण आखले आहे. यानुसार करूर येथे होम फर्निशिंग व हँडलूम उत्पादने, सुरत येथे टेक्निकल टेक्सटाइल्स व मॅन-मेड फायबर, जयपूर येथे हँडलूम व हस्तकला, वाराणसी येथे हँडलूम व कार्पेट्स, तर लुधियाना येथे लोकर व निटेड वस्त्रांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत मोठ्या प्रमाणावर कापड उत्पादनासोबतच गारमेंट उद्योगही वेगाने विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी TEFC स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
टेक्स्टाईल कमिटीमार्फत उद्योगांना गुणवत्ता मूल्यांकन, निर्यात प्रमाणन, प्रयोगशाळा चाचण्या, आयएसओ सल्ला, बाजार संशोधन तसेच ‘समर्थ’ व ‘हँडलूम मार्क’सारख्या शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते. आता TEFCच्या माध्यमातून प्रशिक्षण व क्षमता विकास, निर्यात रोडमॅप तयार करणे, आयात-निर्यात शुल्काबाबत मार्गदर्शन, फ्री ट्रेड करारांची माहिती, विविध देशांच्या तांत्रिक निकषांची जाणीव करून देणे आणि नवीन बाजारपेठांचा शोध घेण्याचे कामही केले जाणार आहे.
आज उद्घाटन कार्यक्रम
इचलकरंजीत TEFC सेंटर सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी ६ वाजता जवाहर नगर येथील राधे बँकेट हॉल येथे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते होणार असून चंद्रकांत पाटील, अनिल गोयल, सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच टेक्स्टाईल कमिटीचे सचिव कार्तिकेय धांडा, डायरेक्टर जे. डी. बर्मन आणि जॉईंट डायरेक्टर आर. चंद्रन मार्गदर्शन करणार आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा