श्री वेताळ मंदिराचा शतक महोत्सव उत्साहात; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
इचलकरंजी :
येथील श्री वेताळ कार्तिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने श्री वेताळ मंदिराच्या शतकोत्तर वाटचालीचे औचित्य साधत ‘शतक महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मंदिर स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महोत्सवानिमित्त श्री वेताळ मंदिरात श्री गणेश मूर्ती, श्री हनुमान मूर्ती तसेच श्री महादेव पिंड व नंदी यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. धार्मिक विधींना १९ जून रोजी धान्यवास कार्यक्रमाने सुरुवात होणार असून २० जून रोजी जलाधिवास विधी पार पडणार आहेत. त्यानंतर २१ जून रोजी दुपारी ४ वाजता नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.
महोत्सवाचा मुख्य सोहळा सोमवार, २२ जून रोजी आयोजित करण्यात आला असून सकाळी ९ वाजता होमहवन तर सकाळी ११ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधी होणार आहे. हा धार्मिक सोहळा पनवेल येथील विश्वनाथ सुर्यवंकर (महाराज) यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमाला सुधाकर साणप (कल्याण), संजय वेध (कल्याण), आप्पासो पाटील (उरुण खोपटा) आणि अल्पेश भांगरे (डोंबिवली) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री वेताळ कार्तिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व संचालक मंडळाने केले आहे.
श्री वेताळ मंदिर शतक महोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांची माहिती देताना ट्रस्ट पदाधिकारी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





