कल्लाप्पांणा आवाडे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गृहनिर्माण प्रकल्पाची घोषणा
इचलकरंजी :
बँकेच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आर्थिक आढाव्यासोबतच गृहनिर्माण व उद्योग क्षेत्राला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी संस्थापक नेते कल्लाप्पाणा आवाडे (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना स्वप्निल आवाडे यांनी बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, संस्थापक आवाडे दादांच्या आदर्शावर दिलेल्या सहकार, विश्वास आणि विकासाच्या तत्त्वांचा वारसा पुढे नेण्याचे काम बँक करत आहे. सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचा वाढता विश्वास हीच बँकेची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात बँकेचा विस्तार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी नवीन संकल्पना आणि आधुनिक सेवा राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. गृहनिर्माण, उद्योग आणि लघुउद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्यावर बँकेचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल बँकिंग सेवांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले.बँकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले. शेवटी सर्वांनी बँकेशी नाते अधिक दृढ ठेवावे, असे आवाहन केले
गृहनिर्माण योजनेबाबत बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. लाभार्थ्यांनी प्रारंभी १ लाख रुपयांची गुंतवणूक करायची असून उर्वरित ८ लाख रुपयांची रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्ज वितरण करताना ते वैयक्तिक स्वरूपात मंजूर करण्यात यावे, मात्र लाभार्थ्यांना गृहनिर्माण सोसायटीचे सभासद करून त्यांना संघटित पद्धतीने लाभ मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या उपक्रमामुळे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय तसेच स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून शहरात नियोजित गृहनिर्माण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याचवेळी इचलकरंजी शहराच्या औद्योगिक विकासाबाबतही त्यांनी भूमिका मांडली. शहरातील एक्स्पोर्ट इंडस्ट्रीला अधिक बळ मिळण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढाकार घ्यावा व बँकांनीही विशेष सवलतीच्या दराने कर्जपुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले. निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक ३ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेस सहकार महर्षि आवाडे दादा,आमदार राहुल आवाडे,बँकेचे सर्व संचालक, पदाधिकारी,सभासद तसेच मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर उपस्थित होते. सभेत बँकेच्या आगामी विस्तार, गृहनिर्माण व उद्योग विकासाच्या उपक्रमांना उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सभेत बोलताना चेअरमन स्वप्निल आवाडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







