15 गंभीर गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार द्वारकाधीश खंडेलवाल दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईअंतर्गत द्वारकाधीश जयनारायण खंडेलवाल (रा. न्यू इंडस्ट्रियल इस्टेट, रोहित बिल्डिंग, भोनेमाळ, इचलकरंजी) याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी खंडेलवालविरुद्ध प्रस्ताव सादर केला होता.
खंडेलवाल याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 10, इचलकरंजी पोलीस ठाण्यात 3 आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यात 2 असे एकूण 15 दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, गंभीर मारहाण, जबरी, बेकायदेशीर जमाव, दहशत निर्माण करणे तसेच बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. यापूर्वी त्याला 2017 मध्ये 18 महिन्यांसाठी आणि 2021 मध्ये एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तसेच त्याच्याविरुद्ध पाच प्रतिबंधात्मक कारवायाही नोंद आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी प्रस्तावाची चौकशी करून अहवाल उपविभागीय दंडाधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर अंतिम आदेश देत खंडेलवाल याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले.
सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल पवन गुरव यांनी, तर चौकशी अहवालाचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक सागर हारगुले यांनी पाहिले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








