भक्तिरसात न्हाऊन निघाले श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय; आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानदिंडी उत्साहात
इचलकरंजी :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने ज्ञानदिंडी सोहळा उत्साहात पार पडला. वारकरी परंपरेचा उत्साह, संतविचारांचा संदेश आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर पंढरीच्या वारीने भारावून गेला.
सकाळपासूनच विद्यार्थिनींनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला. गांधी टोपी, तुळशीच्या माळा, भगव्या पताका, टाळ आणि मृदंगाच्या साथीने विद्यार्थिनींनी “ज्ञानोबा माऊली तुकाराम”, “बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “राम कृष्ण हरी”च्या जयघोषात ज्ञानदिंडी काढली. काही विद्यार्थिनींनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या डॉ. श्रुती जोशी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन, अभिषेक व आरतीने झाली. त्यानंतर टाळ, मृदंग, झांज आणि टिपऱ्यांच्या गजरात ज्ञानदिंडी महाविद्यालय परिसरातून मार्गस्थ झाली. संतांच्या अभंगांचे गायन, फुगडी आणि गोल रिंगणातून विद्यार्थिनींनी वारीचे महत्त्व, समता, सहिष्णुता आणि एकतेचा संदेश दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. श्रुती जोशी म्हणाल्या, “वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नसून आत्मशुद्धी, समाजसेवा आणि संतांच्या विचारांचा जीवनात अंगीकार करण्याचा संस्कार आहे.”
दरम्यान, डॉ. श्रुती जोशी यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या आजीव सेवकपदी नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुधाकर इंडी, डॉ. विठ्ठल नाईक, प्रा. प्रतिभा पैलवान व प्रा. अंकुश कुरणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वाती हाळवणकर यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
आयोजित दिंडीत आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयाचे शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







