पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी प्रलंबित प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करा-ना.पंकजा मुंडे
इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी मंजूर झालेले मात्र प्रलंबित असलेले प्रकल्प तातडीने हाती घ्यावेत. तसेच इचलकरंजीतील झेडएलडी (Zero Liquid Discharge) प्रकल्पाचे कामही तातडीने सुरू करून ते पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
पंचगंगा नदी ही जिल्ह्याची जीवनदायिनी असून, वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य, शेती तसेच नदीकाठच्या परिसरावर विपरीत परिणाम होत असल्याचे आमदार आवाडे यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी व अन्य प्रदूषणकारी घटक रोखण्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना व प्रकल्प उभारण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी मंजूर असलेल्या परंतु प्रलंबित प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, त्या वस्त्रनगरी इचलकरंजीला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे पंचगंगा प्रदूषण निर्मूलनाच्या कामांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बैठकीस सहपालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमल महाडिक यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत चर्चा करताना ना.पंकजा मुंडे,सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, आ.राहुल आवाडे,सचिव राहुल रेखावर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







