पोलीस बांधवांसाठी ‘एक राखी पोलिसांसाठी’ उपक्रमातून रक्षाबंधनाचा आनंद
महिला दक्षता कमिटी, इनरव्हील क्लब, मारवाडी युवा मंच मिड टाउन व वीर महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम
इचलकरंजी : रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाची, आपुलकीची आणि विश्वासाची राखी बांधून हा सण उत्साहात साजरा करते. मात्र, समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना आपल्या बहिणीकडे जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करता येत नाही. कर्तव्याला प्राधान्य देत त्यांना अनेकदा रक्षाबंधनासह दिवाळी, दसरा यांसारख्या विविध सणांच्या दिवशीही आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते. या पोलीस बांधवांनाही रक्षाबंधनाच्या सणाचा आनंद मिळावा, या भावनेतून ‘एक राखी पोलिसांसाठी’ हा भावनिक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
महिला दक्षता कमिटी, इनरव्हील क्लब, मारवाडी युवा मंच मिड टाउन व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, महेश चव्हाण, गजेंद्र लोहार,सपोनि विकास शिंदे,पूनम माने,श्रीकृष्ण दरेकर,पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे,महावीर कुटे,प्रवीण साने, गोविंद कोळेकर,अशोक चव्हाण तसेच विविध पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत असतात. सण-उत्सवांच्या काळात नागरिक आपल्या कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करत असताना पोलीस बांधव मात्र बंदोबस्ताच्या कर्तव्यात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमावेळी महिला प्रतिनिधींनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्या कार्याला सलाम केला. राखी बांधताना उपस्थितांमध्ये आपुलकीचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले. पोलीस बांधवांनीही या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले.
यावेळी नगरसेविका सपना भिसे,इनरव्हीलच्या मुग्धा शहा, मारवाडी युवा मंचच्या अनुराधा काबरा, विर महिला मंडळाच्या प्रियांका बमन्नावर,महिला दक्षता कमिटीच्या वैशालीताई नाईकवडे,ललिता पुजारी,शुभांगी शिंत्रे,निर्मला मोरे,अनिता जैन,मेघा कांचनकुटी, वैशाली पोवार, मेघा खोत,बिस्मिला गैबान, सुषमा भिसे,पोलीस मित्र संघटनेच्या रजनी शिंदे व अनिल बमन्नावर तसेच महिला पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस बांधवांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि त्यांच्या त्यागाला सलाम करणारा तसेच समाज व पोलीस यांच्यातील स्नेहाचे नाते अधिक दृढ करणारा ‘एक राखी पोलिसांसाठी’ हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला.
पोलिस स्टेशनमध्ये रक्षाबंधन कार्यक्रमावेळी सामाजिक संस्थांच्या सदस्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









