स्पर्धेची चुरस वाढविणा-या सामाजिक आशयाच्या एकांकिका.
इचलकरंजी:
येथील राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर भागातील संघानी स्पर्धेची चुरस वाढविणाऱ्या आणि सामाजिक आशय जपणाऱ्या विविध प्रकारच्या एकांकिका सादर केल्या. मोठ्या संख्येने उपस्थित रसिकांचा उत्तम प्रतिसाद सर्वांनी मिळविला. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने सलग २६व्या वर्षी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या दिवसातील पहिली एकांकिका इम्पिरिकल फाउंडेशन कल्याण – ठाणे या संघाने सादर केली. सुदर्शन पाटील लिखित आणि दिग्दर्शित ‘सर्पसत्र’ या एकांकिकेमध्ये जातीय, वर्गीय संघर्षाबरोबरच एकदा माणसाचा जमाव किंवा झुंड झाली तर ती कशी अमानवी बनते तसेच त्यावर सौहार्दातून विधायक उत्तर निघू शकते याचा वेध घेण्यात आला. दुसरी एकांकिका पी एम पी एम एल नाट्य सेवा संघ, पुणे या संघाने विनोदी शैलीत सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. चैतन्य सरदेशपांडे लिखित ‘ठसका’ या एकांकिकेचे दिग्दर्शन दिलीप आंग्रे यांनी केले होते. व्यसन नसलेल्या व्यक्तीला सुद्धा कधीतरी अनपेक्षितपणे, नकळतपणे व्यसनाला सामोरे जावे लागते आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती यामध्ये सादर करण्यात आली.
त्यानंतरची एकांकिका फोर्थ वॉल थिएटर, इचलकरंजी या संघाने सादर केली. ‘लॉटरी’ या एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन निखिल शिंदे यांनी केले होते. गरीब परिस्थितीत जगणाऱ्या माणसांचीही आपली स्वप्ने असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते अशाच एका जोडप्याची आणि त्यांच्या शेजारी असलेले आजोबा व नातवाची गोष्ट यामध्ये चांगल्या प्रकारे सादर करण्यात आली. त्यापुढील एकांकिका कलादर्शन व नाट्यसंस्कार पुणे या संघाने सादर केली. ‘बॉईल्ड शुद्ध शाकाहारी’ या रसिकांची दाद घेणा-या एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन विनोद रत्ना यांचे होते. वारकरी संप्रदाय, रितीरिवाज आणि प्रथा जपणाऱ्या एका छोट्या गावातील वृद्ध जोडप्याची कथा रंजक पद्धतीने सादर करण्यात आली. चांगला संसार हीच देवाची खरी भक्ती आहे आणि आपल्या माणसांची इच्छा पूर्ण करणे हीच देवाचीही इच्छा असते, असा आशय यामध्ये होता. यामधील तांत्रिक बाजूही लक्षणीय होत्या.
दुसऱ्या सत्रात रंगप्रसंग, कोल्हापूर या संघाने प्रमोद पुजारी लिखित व दिग्दर्शित ‘अलमोस्ट डेड’ ही एकांकिका परिणामकारकपणे सादर केली. आपला देश सुजलाम सुफलाम असला तरी कॉर्पोरेट जगतात परदेशी जाणे आणि स्थायीक होणे प्रगतीचे मानले जाते, यावर एक वेगळा दृष्टिकोन यामध्ये मांडण्यात आला. त्यानंतर कलासक्त, मुंबई या संघाने इरफान मुजावर लिखित ‘पूर्णविराम’ ही एकांकिका सादर केली. योगेश कदम यांनी दिग्दर्शन केले होते. दोन स्त्रियांच्या मधील मतभेद एखाद्या माणसाबद्दल कशाप्रकारे निर्माण होतात आणि नात्यांचा, मानवी भावनांचा मेळ कसा घातला जातो, कसा निर्णय घ्यावा लागतो या आशयाची ही एकांकिका चांगल्या प्रकारे सादर करण्यात आली.
तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात निर्मिती नाट्य संस्था सातारा या संघाने ‘लेबल’ ही आशयपूर्ण एकांकिका सादर केली. लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश माने हे होते. आज समाजातील अनेक घटकांवर जात, वर्ग आणि धर्माचे लेबल लागलेले दिसते किंवा लावले जाते. पण याच्या पलीकडे जाऊन भारत सर्वांचा देश आहे आणि माणुसकी जपणे आवश्यक आहे ही भावना या एकांकिकेमधून पोहोचविण्यात आली. त्यानंतर क्रिएटिव्ह कार्टी अंधेरी – मुंबई या संघाने चेतन टेंभुर्णीकर लिखित आणि राजश्री जमदाडे दिग्दर्शित ‘मंडेला इफेक्ट’ ही एकांकिका छान प्रकारे सादर केली. एका छोट्या गावात दुष्काळ आणि अवर्षणामुळे काय परिस्थिती निर्माण होते, ग्रामस्थांच्या मनात रुजलेली जातीप्रथा कशी बाजूला होऊ शकते असा मानवी मनाच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकणारी ही एकांकिका होती. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सुरू असलेल्या या स्पर्धेस इचलकरंजी व परिसरातील तसेच सावंतवाडी, कोल्हापूर, सांगली येथील रसिकांचा प्रतिसाद मिळाला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800