शिक्षणाचा उपयोग दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी व्हावा-प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांचे प्रतिपादन
इचलकरंजी:
मातृत्व आणि पालकत्वाचा भार निसर्गानेच स्त्रीवर दिलेला आहे.तो सक्षमपणे पेलला पाहिजेच. पण त्याचबरोबर आपल्या शिक्षणातून मुलींनी खऱ्या अर्थाने सबलीकरण ,सुसंस्कृतपणा यांचा अंगीकार केला पाहिजे. सबल होणे याचा अर्थ निर्णयक्षमता, धडाडी, चिकाटी ,प्रामाणिकपणा हे गुण आत्मसात करून आपले समाजभान जागृत ठेवणे असा आहे.समाजभान व नागरिक शास्त्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्वच्छते पासून पर्यावरणापर्यंतचे विविध प्रश्न गंभीर
होत आहेत. त्यावेळी जबाबदार नागरिक म्हणून हस्तक्षेप करण्याची गरज आहे.पुरुषप्रधान संस्कृतीने महिलेला आजही दुय्यम स्थानी ठेवलेले आहे.पण अशावेळी आपण सर्वांनी राजमाता जिजाऊ ते इंदिराजी गांधी आणि सावित्रीबाई फुले ते किरण बेदी अशा सर्वांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांचे विचार कृतीत आणण्याची गरज आहे. त्यातूनच आपण स्वतः ,आपले कुटुंब ,आपला समाज, आणि आपले राष्ट्र संपन्न होणार आहे. म्हणूनच शिक्षणाचा उपयोग स्वतःचा दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी करणे हीच ज्ञानज्योती सावित्रीबाईंना फुले यांना खरी आदरांजली ठरेल असे मत प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी व्यक्त केले. त्या श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला जागृती मंच ,महिला सक्षमीकरण व तक्रार निवारण केंद्र आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात कन्या महाविद्यालयातील संस्थामाता सुशिलाबाई साळुंखे सभागृहात ‘ सावित्रीच्या लेकींची जबाबदारी ‘ या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे होते. मंचावर प्रसाद कुलकर्णी , प्रो.त्रिशला कदम ,प्रा. कॅप्टन प्रमिला सुर्वे उपस्थित होते.
प्रारंभी प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक प्रो. डॉ.त्रिषला कदम यांनी केले. प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी यावेळी विद्यार्थिनींना आजच्या काळातली जबाबदारी कशी पेलली याची विविध उदाहरणे देत आणि वर्तमान मांडत अतिशय सुरेख मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले, मिळालेल्या शिक्षणातून आपले व्यक्तिमत्व विकसित करणे फार गरजेचे असते. परिस्थिती बदलणे स्वतःवर अवलंबून असते ही फुले दांपत्याची शिकवण या निमित्ताने आपण लक्षात घेतली पाहिजे. सावित्रीबाईंचा संघर्ष ध्यानात घेऊन वर्तमानाशी त्याची सांगड घालून विद्यार्थिनींनी वाटचाल केली पाहिजे. प्रा. कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व अध्यापक वृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा .प्रतिभा पैलवान यांनी सूत्रसंचालन केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800