लिंगायत समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आज महत्त्वाची बैठक.
इचलकरंजी : शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शासनदरबारी समाजाच्या हक्काच्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी नव्या संघटनेची स्थापना करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक आज रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता, जिजामाता मार्केट, गायत्री भवनजवळ आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समाजातील ज्येष्ठ व जाणते व्यक्तिमत्व अशोकराव स्वामी (आण्णा) यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे लिंगायत समाजातील सर्व घटकांनी या बैठकीला उपस्थित राहून आपले विचार आणि सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील वीरशैव लिंगायत समाजामध्ये काही मोजक्याच लोकांकडून एकाधिकारशाही वाढली असून, समाजहिताच्या निर्णयांमध्ये इतरांना सहभागी करून घेतले जात नाही. यामुळे समाजाच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आणि समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच शासकीय स्तरावरील कामांमध्ये सहकार्य करण्यासाठी नव्या संघटनेची आवश्यकता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नियोजित वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ, इचलकरंजी यांच्यावतीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विचारविनिमय करून ठोस निर्णय घेण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक मंडळाने केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800