आशयपूर्ण एकांकिका सादरीकरणाने मराठी दिन महोत्सवाची सांगता

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आशयपूर्ण एकांकिका सादरीकरणाने मराठी दिन महोत्सवाची सांगता

इचलकरंजी:
 कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन- मराठी दिन महोत्सवाच्या निमित्ताने येथे आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका उत्सवातील लॉटरी आणि अलमोस्ट डेड या दोन वेगळ्या शैलीतील पण आशयपूर्ण अशा दोन एकांकिकांच्या सादरीकरणाने चार दिवसीय उपक्रमाची सांगता करण्यात आली. दोन्ही एकांकिकानी रसिक प्रेक्षकांची मनमोकळी दाद मिळविली. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्या वतीने हा उपक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला येथील डि वाय एस पी समीरसिंह साळवे, उद्योजक अभिजीत होगाडे तसेच एकांकिका संघ प्रतिनिधी निखिल शिंदे व किर्ती सुतार आणि संयोजक पदाधिकारी यांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना साळवे यांनी “सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम हे आपल्या शहराची सांस्कृतिक उंची वाढविणारे असतात आणि अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे आयोजित करणाऱ्या संस्था कौतुकास्पद काम करीत आहेत” अशा आशयाचे उदगार काढले. याप्रसंगी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना होगाडे यांनी “मराठी रंगभूमी, मराठी नाट्य चळवळ ही समृद्ध आहेच, तरीही तिचा अधिक विस्तार होण्यासाठी असे कार्यक्रम होण्याची गरज आहे” अशा प्रकारचे उदगार काढले. यावेळी रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले.
एकांकिका उत्सवात फोर्थ वॉल थिएटर इचलकरंजी या संघाने प्रथम आपली ‘लॉटरी’ ही एकांकिका उत्तमरित्या सादर केली. मोलमजुरी करणारे एक अतिशय गरीब नवरा बायको, त्यांच्या शेजारी उत्तरकार्याची कामे करणारा गरीब वृद्ध गृहस्थ व त्यांचा छोटा नातू यांची ही भावस्पर्शी गोष्ट होती. त्यांच्यात छोटी मोठी भांडणे असली तरी शेवटी संकटात दोन्ही कुटुंबे एकत्र येतात, तो प्रवास या कथेत दाखवण्यात आला. लेखन व दिग्दर्शन निखिल शिंदे यांचे होते तर आविष्कार कांबळे, मानसी कुलकर्णी, सक्षम कदम, वैष्णवी संकापगोळ, सिद्धार्थ संकापगोळ व निखिल शिंदे इत्यादी कलाकारांनी यामधील भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडल्या. प्रकाश योजना अवधूत कुलकर्णी यांची होती तर पार्श्वसंगीत सार्थक खाडे यांनी दिले. नेपथ्य रचना सोहम भोंगाळे यांची होती तर अंकिता कदम यांनी रंगमंच सहाय्य केले.
त्यानंतरची एकांकिका ‘अलमोस्ट डेड’ ही गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर या संघाने प्रभावीपणे सादर केली. कॉर्पोरेट क्षेत्रात परदेशात काम करणारा युवा उद्योजक आणि त्याचे भारतात असणारे आई वडील यांच्या दुरस्थ नात्यांची ही कथा होती. अति कामात गुरफटलेला हा मुलगा वडिलांच्या निधनाच्या दुःखद प्रसंगी सुद्धा कसा असंवेदनशीलपणे वागतो, एक प्रकारे मृतवत बनतो त्याची ही गोष्ट रसिकांना कटू वास्तवाची जाणीव करून देणारी होती. लेखन व दिग्दर्शन प्रमोद पुजारी यांचे होते. अनुपम दाभाडे आणि योगेश हवालदार या दोन प्रमुख कलावंतांनी उत्तम प्रकारे भूमिका पार पाडल्या. नेपथ्य रचना ऋतुराज कुलकर्णी व रमा कुलकर्णी यांची होती तर प्रकाश योजना अर्जुन पिसाळ यांची होती. पार्श्वसंगीत साहील बारस्कर यांचे होते तर रंगभूषा कीर्ती सुतार आणि वेशभूषा गायत्री कुंभार यांनी पाहिली.
दोन्ही एकांकिकांनी आपल्या परिणामकारक सादरीकरणामुळे रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी दिन महोत्सव उपक्रमात लॉटरी ही एकांकिका सादर करताना कलाकार… 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More