सम-विषम पार्किंगबाबत अप्पर पोलीस अधिक्षकांसोबत बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील सम विषम पार्किंग बाबत अप्पर पोलीस अधीक्षकांच्या सोबत बैठक करून तोडगा काढण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवे यांनी इचलकरंजी नागरिक मंचच्या शिष्टमंडळास दिले.
इचलकरंजी शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक तब्बल १४ महिन्यांनंतर ३ जानेवारी २०२५ रोजी रोटरी क्लब येथे पार पडली. या बैठकीत शहर वाहतूक नियंत्रणावरील विविध वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेषतः सम-विषम पार्किंगच्या अंमलबजावणीवर नागरिकांच्या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन, सम-विषम पार्किंगबाबत फेरविचार करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. तसेच,शहिद भगतसिंग बागेजवळील नो पार्किंग झोनबाबतही पुनर्विचार केला जाईल, असे सांगण्यात आले होते. यासंदर्भात व्हिडिओ रेकॉर्डिंगसह बातम्यांमध्येही प्रसिद्धी मिळाली होती.
मात्र या निर्णयानंतरही शहर वाहतूक शाखेचे प्रभारी श्री. प्रशांत निशाणदार यांनी सम-विषम पार्किंग संदर्भात कारवाई सुरू राहणार असून हा निर्णय आमच्या अधिकार क्षेत्रात नाही, याबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करा,” असे उत्तर दिले
सम-विषम पार्किंगच्या अंमलबजावणीमुळे मुख्य रस्त्यावरील व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ग्राहकांना पार्किंगच्या समस्येमुळे व्यवहार करणे कठीण झाले असून वाहनधारकही या नियमांमुळे त्रस्त झाले आहेत.
याबाबतीत ७ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात तातडीने सम-विषम पार्किंग रद्द करावे आणि शहिद भगतसिंग बागेजवळील नो पार्किंग झोन हटवण्यासाठी जाहीरनाम्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.या विषयावर लवकरच अप्पर पोलीस अधिक्षकांसोबत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन साळवे यांनी दिले आहे.
निवेदन देताना संजय डाके,उदयसिंह निंबाळकर,उमेश पाटील,शितल मगदुम,महेंद्र जाधव,दीपक पंडित,राम आडकी, गोपाल पटेकरी, विद्यासागर चराटे आणि अभिजित पटवा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800