इचलकरंजी पाणी योजनेवर एप्रिलमध्ये निर्णय-सुळकुड योजना रद्द झाल्यास शहरवासियांचा उद्रेक होण्याची शक्यता.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी पाणी योजनेवर एप्रिलमध्ये निर्णय-सुळकुड योजना रद्द झाल्यास शहरवासियांचा उद्रेक होण्याची शक्यता.

इचलकरंजी

इचलकरंजीसाठी मंजूर सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजना संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजना संदर्भातील सद्यस्थितीची माहिती जाणून घेत या प्रश्‍नी एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.
इचलकरंजीसाठी राज्य शासनाने मंजूर केलेली दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात तसेच मागील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्‍नावर लक्षवेधी मांडत बैठक घेऊन योजना मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अत्यंत गोपनीयरित्या घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील, नगर विकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार राहुल आवाडे यांनी, राज्य शासनाने इचलकरंजी शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. पण योजनेच्या कामाची अंमलबजावणी होत नाही. उदरनिर्वाहाच्या निमित्ताने राज्याच्या कानकोपर्‍यातून अनेक कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे वस्त्रनगरीची गरज लक्षात घेऊन तातडीने शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी, सुळकूड योजना संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेत कोणतीही अडचण येणार नाही, विरोध होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत विषयावर सखोल चर्चा केली. आणि या संदर्भात पुनश्‍च एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात बैठक घेण्याचे सांगितले.

शहरवासीयांत संताप.
आ.राहुल आवाडे यांच्या मागणीवरून बैठक झाली,खासदार धैर्यशील माने ऑनलाईन उपस्थित राहिले,इचलकरंजीच्या निवडणूक प्रचार सभेत सुळकुड अमलबजावणी साठी कसा पर्याय काढायचा मला माहिती आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते,बैठकीत विरोध होणार नाही याची दक्षता घेण्याचे फडणवीस यांनी सांगितले.त्यामुळे सुळकुड योजना रद्द करून नविन पर्याय दिल्यास विरोध होणार नाही कशावरून या विषयावर शहरात नाराजी पसरली असून कागल परिसरातील नेत्यांना खडसावणार की इचलकरंजी शहरास पर्याय देत परत पाण्यासाठी वाट बघायला लावणार याबाबत शहरात संताप व्यक्त होत आहे.
फोटो- इचलकरंजी पाणी योजनेविषयी विधानभवनात बैठकी वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सहपालकमंत्री माधुरी मिसाळ,माजी मंत्री प्रकाश आवाडे,आ.राहुल आवाडे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More