अजितदादा मुश्रीफांसमोर सुळकुडबद्दल काय बोलणार? योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अजितदादा मुश्रीफांसमोर सुळकुडबद्दल काय बोलणार? योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह?

इचलकरंजी –
महाविकास आघाडी सरकारने २०२० साली मंजूर केलेल्या सुळकुड पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणी बाबत आज इचलकरंजी दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार काय बोलणार याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे स्वतःच मंजूर केलेली योजना गुंडाळल्याचा प्रयत्न केल्याचा ठपका असणारे मंत्री हसन मुश्रीफ ही दौऱ्यात असणार आहेत.
त्यांनीही याबाबत मागील काही काळात स्पष्ट भूमिका घेतली नाही. मात्र, आज इचलकरंजी दौऱ्यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या मुद्द्यावर काय बोलणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुळकुड पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला होता. मात्र,निवडणुकीपूर्वी समीकरणे बदलल्यानंतर या योजनेला ब्रेक लागला. त्यामुळे, ज्यांनी योजना मंजूर केली, तेच नेते स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुंडाळण्यास भाग पाडत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुश्रीफ यांचा ‘खाजगी’ निरोप उघड इचलकरंजीकरांच्या भावनांशी खेळ?
सुळकुड योजना प्रत्यक्षात येईल, असे मोठमोठे दावे केले गेले. निवडणुकीपूर्वी हसन मुश्रीफ यांनी ‘सत्ता आल्यावर सुळकुड योजनेची कुदळ मारू’ असे खाजगीत सांगितल्याचे चर्चेत आहे. मात्र, आता मंत्री झाल्यानंतर त्यांनी यावर मौन बाळगले आहे. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे.

इचलकरंजी शहरासह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. नागरिकांना ६ ते ८ दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, तोही कमी दाबाने मिळतो. त्यामुळे रोजच्याच गरजांसाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. सुळकुड योजनेवर आशा ठेवून बसलेल्या नागरिकांची आता सहनशक्ती संपली आहे.

चोपडे यांचे निवडणुकीपूर्वीचे आश्वासन हवेत विरले?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत विधानसभा निवडणूक लढवणारे विठ्ठल चोपडे यांनी ‘४ महिन्यांत पाणीप्रश्न सोडवू’ अशी ग्वाही दिली होती. मात्र, त्यांना केवळ २४६१ मते मिळाल्याने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी या प्रश्नावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे चोपडे यांच्यावरही नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष – पोकळ आश्वासने की ठोस निर्णय?
आज हसन मुश्रीफ आणि अजित पवार या मुद्द्यावर स्पष्टीकरण देणार का? की केवळ नवीन आश्वासनांचा पाऊस पडणार? याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे. नागरिकांना अजून किती दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार? हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More