कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा पुरुष व किशोर गटात कोल्हापूर, महिलात धाराशिव आणि किशोरी गटात सांगली अजिंक्य

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा,पुरुष व किशोर गटात कोल्हापूर, महिलात धाराशिव आणि किशोरी गटात सांगली अजिंक्य

इचलकरंजी:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर, कोल्हापूर खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूर, महिला गटात धाराशिव, किशोर गटात कोल्हापूर आणि किशोरी गटात सांगली या संघांनी अजिंक्यपद पटविले. तर अनुक्रमे मुंबई उपनगर, पुणे, सांगली व पुणे हे संघ उपविजेते ठरले. विजेत्या संघांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि स्पर्धा समिती उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे
यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात आली.
येथील विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेत अनेक रंगतदार सामने होऊन क्रीडारसिकांना मेजवानी मिळाली. पुरुष गटात कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर, महिला गटात धाराशिव विरुध्द पुणे, किशोर गटात कोल्हापूर विरुद्ध सांगली तर किशोरी गटात सांगली विरुद्ध पुणे जिल्हा यांच्यात टक्करीची लढत झाली. पारितोषिक वितरणप्रसंगी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार शिवाजी पाटील, आमदार अशोकराव माने, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे, उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसुळ, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त सुषमा शिंदे, कोल्हापूर जिल्हा खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर, सुनिल पाटील, शेखर शहा,  विठ्ठल चोपडे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी 40 संघातील प्रत्येक खेळाडू आणि संघ व्यवस्थापक त्याचबरोबर पंचांना आमदार राहुल आवाडे यांच्या वतीने स्मार्ट वॉच गिफ्ट देण्यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
पुरुष गटात नाणेफेक जिंकून मुंबई उपनगरने संरक्षण घेतले. पण कोल्हापूरच्या खेळाडूंनी आक्रमण करत पहिल्या डावात 9 गडी बाद केले. प्रत्युतरादाखल खेळताना मुंबई संघानेही जोरदार आक्रमण करताना  11 गुण मिळवत मध्यंतरापर्यंत 2 गुणांची आघाडी घेतली. तिसऱ्या पळतीत कोल्हापूर संघाला मुंबईच्या खेळाडूंनी चांगले झुंजवले. या डावात कोल्हापूर संघाने 9 गडी टिपले. विजयासाठी मुंबईला 8 गुणांची आवश्यकता असताना कोल्हापूरच्या भक्कम संरक्षणामुळे केवळ 7 गडी बाद करता आल्याने सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे पुन्हा 9 मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यामध्ये प्रथमता  कोल्हापूरने दमदार आक्रमण करत 12 गुण मिळवले. मुंबईला विजयासाठी 13 गुणांची गरज असताना कोल्हापूरच्या खेळाडूंसमोर मुंबईचे शर्थीचे प्रयत्न तोकडे पडल्याने 11 गुण मिळाले आणि कोल्हापूरने अवघ्या 1 गुणाने सामना जिंकत अजिंक्यपदावर नाव कोरले

किशोर विभागात कोल्हापूर विरुद्ध सांगली हा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. कोल्हापूर संघाने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. सांगलीने आक्रमणात कोल्हापूरचे 10 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कोल्हापूरने 11 गडी बाद करून मध्यंतरापर्यंत 1 गुणांची आघाडी घेतली. तिसऱ्या पाळीमध्ये कोल्हापूरने भक्कम संरक्षण केल्याने सांगलीला 5 गडी टिपता आले. चौथ्या पाळीमध्ये कोल्हापूरला 5 गुणांची आवश्यकता असताना  सांगलीच्या खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजविले. अखेरच्या  क्षणांमध्ये 5 वा गडी टिपत कोल्हापूरने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
किशोरी विभागात सांगली विरुद्ध पुणे हा सामनाही रंगतदार झाला.  सांगलीच्या भक्कम संरक्षणापुढे पुणे संघ फक्त 2 गडी बाद करू शकला. सांगलीने आक्रमणामध्ये 11 गडी बाद करून मध्यंतरापर्यंत 9 गुणांची निर्णायक आघाडी घेतली. तिसऱ्या पाळीमध्ये पुणे संघ फक्त 6 गडी बाद करू शकला. त्यामुळे हा सामना सांगली संघाने 1 डाव राखून 3 गुणांनी जिंकला.
महिला गटातील  धाराशिव विरुद्ध पुणे सामन्यात पुणे संघाने पहिल्या पाळीत 5 गडी बाद केले. दुसऱ्या पाळीमध्ये धाराशिवने  8 गडी बाद करून 3 गुणांची आघाडी घेतली. तिसऱ्या पाळीमध्ये पुणे संघाला 5 गडीच टिपता आले. शेवटच्या पाळीमध्ये धाराशिव संघाने 4 मिनिटे 30 सेकंद वेळ राखून पुणे संघाचा 2 गुणांनी पराभव केला.
अंतिम लढत पाहण्यासाठी क्रीडारसिकानी मोठी गर्दी केली होती.
किशोर गटाचे व महिला गटाचे बक्षिस वितरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार,दत्तात्रय भरणे,राहुल आवाडे
पुरुष गटाचे बक्षिस वितरण करताना माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार शिवाजी पाटील, आमदार अशोकराव माने, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे, उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसुळ, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त सुषमा शिंदे, 
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More