जीवनद्रष्टा असल्याने शेक्सपियर आजही प्रभावी ठरतो -प्रा. मिलिंद दांडेकर यांचे प्रतिपादन
इचलकरंजी
शेक्सपियर आपल्या प्रत्येक नाटकाच्या पात्रांच्या संवादातून सर्वांना उपयोगी ठरेल असा काही ना काही संदेश देत असतो. काळ बदलत गेला तरी माणसाचे स्वभाव शास्त्र,वर्तनशास्त्र, मानसशास्त्र बदलत नाही. म्हणूनच शेक्सपियर साडेचारशे वर्षानंतरही समकालीन ठरतो.तो आजही प्रस्तुत वाटतो आणि काही शतकांनीही प्रस्तुत वाटेल. मला जग जसे दिसले तसे मी नाटक लिहिले आणि नाटक हे माझ्या उपजीविकेचेही साधन आहे असं सांगणारा शेक्सपियर हा जगभर सर्वाधिक वाचला गेलेला,अभ्यासला गेलेला, पुस्तक रूपाने खपला गेलेला, लेखनावर संशोधन केला गेलेला जागतिक साहित्यावर आपली कायमची स्वतंत्र मुद्रा उमटून गेलेला महान नाटककार आहे. स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून मानवी स्वभाव व मानवी जीवन यांचं नेमकं रेखाटन करणारा शेक्सपियर हा जीवनद्रष्टा साहित्यिक होता ,असे मत इंग्रजी साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.मिलिंद दांडेकर यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने जागतिक ग्रंथदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ‘ जीवनद्रष्टा नाटककार शेक्सपियर ‘ या विषयावर बोलत होते. प्रारंभी शशांक बावचकर यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. मिलिंद दांडेकर म्हणाले, शेक्सपियर नाटकातील संवादातून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतो. मर्चंट ऑफ व्हेनिस नाटकावरून तो वरून सुंदर दिसणारी वस्तू आतून कुरूप असू शकते,हॅम्लेट या नाटकातून कृतीशिवाय विचार वांझोटा ठरतो, मॅकबेथ मधून अती महत्त्वाकांक्षा योग्य नाही त्यातून अति तिथे माती होऊ शकते, अथेल्लो मधून अतिरेकी संशयी स्वभाव हानिकारक ठरतो, राजा लीयर मधून बापावर किती प्रेम आहे हा निकष उत्तराधिकारी ठरवताना लावणे मूर्खपणाचे असते असा संदेश देताना दिसतो. शेक्सपियरच्या पात्रांची नावे सुद्धा त्यांची प्रवृत्ती स्पष्ट करणारी असतात.शेक्सपियरच्या शोकांतिकेतील पात्रे अस्वाभाविक वर्तन व्यवहार करत असतात त्यामुळे त्यांचा शोकात्म अंत अपरिहार्य आहे. सर्वसामान्य स्वभावाची माणसे शोकांतिका घडवत नसतात असेही शेक्सपियर सांगतो.
प्रा . दांडेकर पुढे म्हणाले,गेल्या चारशे वर्षात जगात निर्माण झालेल्या विविध भाषेतील साहित्यावर शेक्सपियरचा मोठा प्रभाव आहे. संशयकल्लोळ पासून नटसम्राट पर्यंतची नाटके असोत किंवा अंगूर पासून ओंकारा, हैदर सारखे आजचे चित्रपट असोत या सर्वांवर शेक्सपियरचा मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. शेक्सपियरचे नाटक वाचत असताना त्याच्यातील कॅरेक्टर आपल्यासमोर उभे राहते हे त्याचे मोठे यश आहे. प्रा. दांडेकर यांनी आपल्या सव्वा तासाच्या भाषणामध्ये शेक्सपियरची विविध नाटके आणि त्यातून त्याने दिलेला विचार याची सविस्तर व अभ्यासपूर्ण मांडली केली. या वेळी जयकुमार कोले, नुरुद्दीन काजी, प्रा.अशोक दास, संजय सातपुते, राजन मुठाणे,अन्वर पटेल, संतोष आबाळे, पांडुरंग पिसे, मनोहर मुदगल ,सुवर्णा पवार ,अरुण दळवी, सौरभ पाटणकर ,राज पटेल ,रामभाऊ ठिकणे, अशोक केसरकर, धुळगोंडा पाटील, बाळासाहेब कदम, राकेश शेटके ,महेंद्र जाधव, विनोद जाधव, संदीप चोडणकर ,दिलीप शिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्य रसिक उपस्थित होते. सचिन पाटोळे यांनी आभार मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800