डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत ६ पदकांसह श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूलची ऐतिहासिक कामगिरी !
इचलकरंजी, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी इचलकरंजी शहराच्या शैक्षणिक इतिहासात एक नवा झळाळता अध्याय साकारताना श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा सहा पदकांसह ऐतिहासिक यश मिळवले. यासोबतच श्रद्धा ऑलिम्पियाड क्वेस्ट (SOQ) या परीक्षेतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत, शाळेचे नाव उज्वल केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माननीय आमदार व माजी मंत्री श्री. विनय कोरे (सावकार) यांच्या साक्षीने अत्यंत उत्साहात पार पडला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक श्री. ए. आर. तांबे सर, डायरेक्टर श्री. अक्षय तांबे सर, मा. बाबासाहेब लाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
२ सुवर्णपदक, ३ रौप्यपदक व १ कांस्यपदक मिळवणारी श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूल ही इचलकरंजीतील एकमेव शाळा ठरली आहे. ही बाब केवळ संस्थेचा गौरव नाही, तर संपूर्ण शहराच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक आहे.
या प्रसंगी बोलताना श्री. विनय कोरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ गुणांचे नव्हे, तर जिद्द, चिकाटीआणि ज्ञानप्रेमाचे प्रतीक आहे. डॉ. होमी भाभा परीक्षेत अशी भरघोस कामगिरी करणारी श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूल ही इचलकरंजीतील एकमेव शाळा आहे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे.
SOQ परीक्षेच्या माध्यमातून शाळेने विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पाया घालण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किक विचारांची बीजे रुजवण्याचे मोलाचे कार्य या शाळेने केले आहे.
या उत्तुंग यशामागे संस्थेचे संस्थापक श्री. ए. आर. तांबे सर, डायरेक्टर श्री. अक्षय तांबे सर, मॅनेजिंग डायरेक्टर सौ. स्नेहल तांबे मॅडम, मुख्याध्यापक प्रियांका मॅडम व दिलीप सर, तसेच शाळेचा मेहनती शिक्षकवृंद आणि समर्पित पालकवर्ग यांचे अथक योगदान लाभले. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात, यशाचे सोनेरी क्षण साजरे करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत आ.विनय कोरे,आप्पासाहेब तांबे सर,अक्षय तांबे व इतर

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800