महावितरणचा कार्यकारी अभियंता प्रशांत राठीवर लाचलुचपत कारवाई,३० हजाराची लाच घेताना ताब्यात
इचलकरंजी, दि. १३ (प्रतिनिधी) येथील सांगली मार्गावरील अर्पाटमेंटमध्ये १८ वीज जोडणीसाठी ३० हजाराची लाच स्विकारताना महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंद राठी (वय ४९, रा. इचल., मुळ रा. धामनगाव, जि. अमरावती) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथील स्टेशन मार्गावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. या कारवाईची माहिती मिळताच कार्यालयातील भ्रष्ट कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांनी आतषबाजी करत कारवाईचे स्वागत केले.
येथील सांगली मार्गावरील एका अर्पाटमेंटमध्ये १८ वीज जोडण्या करायच्या होत्या. यासाठी संबंधित ठेकेदाराने रितसर महावितरणकडे मागणी केली होती. मात्र त्यासाठी कार्यकारी अभियंता राठी यांनी प्रत्येक वीज जोडणीला ५ हजार रुपयेप्रमाणे ९० हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. याबाबत संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. विभागाच्या पथकाने त्याची खातरजमा करुन सापळा रचला होता. अखेर आज त्या अर्पाटमेंटमध्ये वीज जोडणीसाठी ३० हजार रुपये लाच स्विकाताना कार्यकारी अभियंता राठी सापळ्यात रंगेहात सापडले. पोलीस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत प्रकाश भंडारे, विकास माने, संदिप काशिद, सचिन पाटील, उदय पाटील, गजानन कुराडे, प्रशांत दावणे सहभागी झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या कारवाईची माहिती समजताच कार्यालयाकडे धाव घेऊन भ्रष्ट कारामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांनी भली मोठी फटाक्यांची माळ लावून फटाक्यांची आतषबाजी करत कारवाईचे स्वागत केले. तर कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या राठी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आत्तापर्यंत इचलकरंजीतील महावितरण कार्यालयात पाचवेळा कारवाई करुन अधिकारी, कर्मचारी आणि सरकारी ठेकेदारासह ६ जणांना ताब्यात घेतले आहे. तरीही भ्रष्ट कारभार सुरुच असल्याने तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईत करुन कार्यकारी अभियंता राठी यास लाच घेताना रंगेहात पडकडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आत्तापर्यंत इचलकरंजीतील महावितरण कार्यालयात पाचवेळा कारवाई करुन अधिकारी, कर्मचारी आणि सरकारी ठेकेदारासह ६ जणांना ताब्यात घेतले आहे. तरीही भ्रष्ट कारभार सुरुच असल्याने तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईत करुन कार्यकारी अभियंता राठी यास लाच घेताना रंगेहात पडकडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800