तुम्ही शिवभक्त होऊ नका, शिव अनुयायी व्हा-राहूल नलावडे (रायबा)
इचलकरंजी:
“आज आपणास सर्वत्र शिवभक्त दिसतात. ते फक्त शिवरायांचा जयजयकार करतात, पण ही फक्त उत्सवबाजी आहे. त्यामुळे तुम्ही फक्त शिवभक्त होऊ नका, तर ‘शिव अनुयायी’ व्हा.
असे खरे अनुयायी महाराजांच्या विचारधारेप्रमाणे वाटचाल करून उत्तम आयुष्य जगू शकतात” अशा आशयाचे उदगार शिव – शंभूचरित्र अभ्यासक आणि व्याख्याते राहूल नलावडे यांनी काढले. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४७ व्या मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी ते बोलत होते.
‘छत्रपती शिवरायांचे नेतृत्व कौशल्य’ या विषयावर नलावडे यांनी आशयपूर्ण तसेच आवेशपूर्ण असे विचार मांडले. “स्वराज्य संस्थापक आणि जाणता राजा अशी ओळख असलेल्या शिवरायांनी कृषी, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगांनी विचार केला. शेतकऱ्यांना न्याय, महिलांना न्याय, व्यापाऱ्यांचे संरक्षण, जनकल्याण, संस्कृती रक्षण, समता अशा सर्व गोष्टींचा विचार त्यांनी नेतृत्व करताना केला आणि त्याप्रमाणे सार्थ असा राज्यकारभारही केला. अशा छत्रपती शिवरायांना घडविण्यात माता जिजाऊंचा मोठा वाटा होता” अशा आशयाचे प्रतिपादन त्यांनी केले.
त्यापूर्वी व्याख्यानमालेचे उदघाटन येथील शैक्षणिक क्षेत्रातील ए. आर. तांबे, व्यवसाय क्षेत्रातील मोहनलाल शहा आणि नलावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना तांबे यांनी “इचलकरंजी सारख्या शहरात व्याख्यानमालेची परंपरा सांभाळून आणि त्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत चांगले विचार पोहोचविण्याचे संयोजकांचे कार्य कौतुकास्पद आहे” अशा प्रकारचे उदगार काढले. याप्रसंगी मर्दा फाउंडेशनचे श्यामसुंदर मर्दा यांच्या हस्ते वक्त्यांचे स्वागत करण्यात आले तर रोटरी क्लब सेंट्रलचे सेक्रेटरी नागेश दिवटे यांनी पाहुण्यांचे गुलाब पुष्प व पुस्तक भेट देऊन स्वागत केले. मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी तर वक्त्यांचा परिचय संजय होगाडे यांनी करून दिला.
आपल्या भाषणात नलावडे यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील अनेक प्रेरणादायी गोष्टींचा तसेच त्यांच्या मोठ्या वैचारिक क्षमतेचा दाखला देणाऱ्या गोष्टींचा आढावा घेतला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि राजकारण धुरंधर श्रीकृष्ण यांच्या व्यक्तिमत्त्वाचा संगम झालेले एकमेव उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवरायांनी मुत्सद्दीपणा, हुशारी आणि गनिमी कावा या कौशल्याने त्याचबरोबर सर्वसामान्य आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले” असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या पावणे दोन तासाच्या ओघवत्या आणि प्रभावी भाषणात नलावडे यांनी, शिवरायांच्या बालपणापासून त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत अनेक प्रेरणादायी गोष्टी आणि घटनांचा आढावा घेतला. “शिवरायांचे नेतृत्व गुण आजच्या काळातही अनुकरणीय आहेत. शिवरायांची आज्ञापत्रे, शिवनीती ही आजच्या काळातही महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असून आज आपण व्यवसाय व्यवस्थापन, अर्थ विचार, कामगार कल्याण, आणि लोक कल्याण अशा ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी शिवरायांनी त्यांच्या काळात अमलात आणल्या होत्या. त्यामुळे शिवरायांचे नेतृत्व कालातीत आहे” असे प्रतिपादन त्यांनी केले. एकूणच आपल्या परिणामकारक भाषणाने नलावडे यांनी उपस्थित सर्वच रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या व्याख्यानास इचलकरंजी व परिसरातील रसिक आणि शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोरंजन व्याख्यानमालेत बोलताना राहूल नलावडे (रायबा)

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800