अनुसूचित जाती सदस्य संख्येत वाढ करावी : अविनाश कांबळे यांची मागणी
इचलकरंजी:
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती (एस.सी.) समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात यावे, अशी मागणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश गुलचंद कांबळे यांनी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ६५ सदस्य संख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीसाठी प्रतिनिधीत्व दिल्यास आणखी २ ते ३ जागा वाढण्याची शक्यता असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित करण्यात आली असून एकूण १६ प्रभागांमधून ६५ सदस्यांची निवड होणार आहे. मात्र अनुसूचित जातीसाठीची सदस्य संख्या ही सन २०१६ मधील निवडणुकीप्रमाणेच ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी ६१ सदस्यांपैकी अनुसूचित जातीचे ६ सदस्य होते.
Advt
सध्या इचलकरंजी शहराची लोकसंख्या ३ लाखांहून अधिक झाल्याने महानगरपालिकेतील एकूण सदस्य संख्या ६५ निश्चित करण्यात आली आहे. परंतु अनुसूचित जाती सदस्य संख्या जुन्या पद्धतीनुसार ६ ठेवली जाण्याची शक्यता आहे. यामुळे अनुसूचित जाती समाजावर अन्याय होईल, असे कांबळे यांनी नमूद केले आहे.
त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेतील सदस्य संख्येची आकडेवारी सादर करत त्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून लोकसंख्या, सदस्य संख्या आणि अनुसूचित जाती सदस्य संख्या निश्चित करण्याचा निकष कोणता याबाबत माहिती अधिकारातून माहिती मागितली आहे.
अनुसूचित जाती सदस्य संख्येत योग्य प्रमाणात वाढ न झाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा अविनाश कांबळे यांनी दिला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







