वस्त्रोद्योग वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत सुधारणा होणार
इचलकरंजी
वस्त्रोद्योग क्षेत्रातील वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी संदर्भात आज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी इचलकरंजीचे आमदार राहुल आवडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सचिव सौ. अंशू सिन्हा आणि सहसचिव श्रीकृष्ण पवार उपस्थित होते.
Advt
बैठकीत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी सरकारकडे अचूक माहिती (डाटा) उपलब्ध नसल्याने नवीन योजना आखताना अडचणी येत असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी सांगितले. यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने उद्योजकांचा डाटा गोळा करण्याचे काम सुरू आहे.
या बैठकीत दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व इतर यंत्रमाधारक संघटनांनी ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावर चर्चा होऊन येत्या शुक्रवारी वस्त्रोद्योग सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत सर्वांना सोयीस्कर अशा पद्धतीचा ऑनलाईन तसेच ऑफलाईन फॉर्म तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवीन अर्जाची रचना झाल्यानंतर जे उद्योजक ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करू इच्छितात, त्यांनी आपले अर्ज दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि एअरजेट असोसिएशनमध्ये जमा करता येतील. नंतर हे अर्ज नागपूर टेक्सटाईल कार्यालयाकडे पाठवले जातील. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचा वीज सवलतीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सुभाष बलवान, एअरजेट पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंडा पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासोबत बैठकीदरम्यान आ.राहुल आवाडे,चंद्रकांत पाटील,अशोक स्वामी,रफिक खानापुरे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







