ऑनलाईन वीज सवलत नोंदणी फॉर्म होणार सुटसुटीत- मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुंबई, दि. ०४ नोव्हेंबर :
यंत्रमाग उद्योगांना मिळणाऱ्या वीज सवलतीसाठीच्या ऑनलाईन नोंदणी फॉर्मचे सुलभीकरण करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, सचिव सौ. अंशू सिन्हा, सहसचिव श्रीकृष्ण पवार, तसेच नागपूर आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त गणेश वांडकर उपस्थित होते.
अलीकडेच शासनाने यंत्रमाग उद्योगांना वीज सवलत सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. मात्र, सद्याचा फॉर्म गुंतागुंतीचा व अवघड असल्याने यंत्रमागधारक संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे फॉर्म अधिक सोपा आणि सुटसुटीत करण्याचा निर्णय यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.
बैठकीत केंद्र व राज्य सरकारकडून यंत्रमाग उद्योगासाठी नव्या योजना आखताना साधे व स्वयंचलित यंत्रमाग, उत्पादन केलेले कापड, कामगार संख्या इत्यादी माहिती आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. सर्वानुमते आता एक सोप्या स्वरूपाचा ऑनलाईन फॉर्म तयार करण्यात आला असून त्यामुळे साधे व स्वयंचलित यंत्रमागधारकांना फॉर्म सहजपणे भरता येईल.
या वेळी मंत्री मा. संजय सावकारे यांनी पॉवरलूम असोसिएशनने यंत्रमागधारकांना फॉर्म भरण्यासाठी मदत करावी व सर्वांनी नवीन योजनांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. तर आमदारांनी वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत विशेष ॲप तयार करून ते उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचे सुचविले.
बैठकीस दि. इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापुरे, संचालक सुभाष बलवान, एअरजेट असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, उपाध्यक्ष प्रकाश गौड, शरद देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री संजय सावकारे यांना निवेदन देताना चंद्रकांत पाटील, सुभाष बलवान, राजगोंडा पाटील,शरद देसाई व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







