इचलकरंजीतील राजाराम स्टेडियम होणार अत्याधुनिक.
इचलकरंजी –
इचलकरंजी शहरातील भव्य राजाराम मैदान आता अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज होणार आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेचे राजाराम स्टेडियम विकसित करण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे सचिव कमलेश्वर पिसाळ यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष भेट देऊन मैदानाची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान आमदार राहुल आवाडे, महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपस्थित होत्या. त्यानंतर महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत शासनाच्या नियम व अटींनुसार एमसीए सोबत करार करून मैदानाचा विकास, सुविधा निर्मिती आणि देखभाल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सन १९८६ साली उभारण्यात आलेले व १९९५ मध्ये विस्तारलेले हे मैदान सुमारे ८ एकरांहून अधिक क्षेत्रात आहे. मात्र मागील १८ वर्षांत येथे फक्त एक रणजी सामना झाल्यानंतर कोणतीही मोठी क्रिकेट स्पर्धा आयोजित झालेली नाही. मैदानाच्या देखभाल-अभावामुळे झालेल्या दुरवस्थेमुळे स्थानिक क्रिकेटपटूंना सराव आणि स्पर्धांसाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे मैदानाच्या विकासाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून राजाराम स्टेडियमचे पुनर्विकसन झाल्यास शहराला दर्जेदार क्रिकेट केंद्र प्राप्त होईल, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.
या पाहणी व बैठकीस महानगरपालिका क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे, शेखर शहा, सचिन खोंद्रे, नागेश पाटील, धनंजय टारे यांच्यासह विविध क्रिकेट संघटनांचे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.
पाहणी करताना एमसीए चे पदाधिकारी व आ.राहुल आवाडे, क्रीडाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







