भाजपच्या कोल्हापूर पूर्व निवडणूक प्रमुखपदी सुरेश हाळवणकर — तरीही आ. राहुल आवाडे यांच्या मुलाखतींनी चर्चेला सुरवात
कोल्हापूर: –
भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची नियुक्ती नुकतीच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या नियुक्तीनंतर हाळवणकर यांना पक्षात महत्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार राहुल आवाडे यांनी स्वतंत्रपणे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आवाडे यांनी हुपरी महानगरपालिकेसाठीच्या उमेदवारांच्या मुलाखती जवाहर साखर कारखान्यात, तर हातकणंगले नगरपालिकेसाठीच्या मुलाखती लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट येथे घेतल्या.
हाळवणकर यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली असताना आ. आवाडे यांनी घाईघाईने या मुलाखती घेण्यामागील नेमके कारण काय, याबाबत विविध तर्क-वितर्कांना ऊत आला आहे.
भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी केलेल्या नियुक्तींना अधीन राहून कार्य करणे अपेक्षित असताना आ. आवाडे यांनी स्वतंत्रपणे घेतलेल्या या मुलाखतींमुळे पक्षातील समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेल्या निवडणूक प्रमुख सुरेश हाळवणकर यांची याबाबतची भूमिका काय असणार याकडे आता संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







