‘श्वासात राजं, ध्यासात राजं’ सादरीकरणास उस्फुर्त प्रतिसाद
इचलकरंजी
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आगमनानिमित्त शहरात आयोजित केलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका नागरिकांच्या उत्साहामुळे अधिक रंगतदार होत आहे. त्याच कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी सायंकाळी शहराच्या मुख्य रस्त्यावर ‘श्वासात राजं, ध्यासात राजं’ हा भव्य ऐतिहासिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक, धारकरी आणि शंभूभक्तांनी उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाची मांडणी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथांवर आधारित होती. पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार यांसारखे ऐतिहासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध गायक अवधूत गांधी, अभिनेत्री स्मिता शेवाळे आणि प्रसिद्ध आर. जे. राहुल यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांना भावूक करत वातावरण भारावून टाकले.
‘श्वासात राजं ध्यासात राजं’ हे गीत आणि ‘शिवबा राजं, युगत मांडली’ या गाण्यावर प्रेक्षकांनी जल्लोषात दाद दिली. कार्यक्रमात महाराजांचे किस्से, प्रसंग, इतिहास आणि प्रेरणादायी विचारांचा समावेश होता. या कार्यक्रमामुळे शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले. स्वराज्यातील धैर्य, त्याग आणि पराक्रम यांचा थरार अंगावर रोमांच उभे करणाऱ्या सादरीकरणातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला.
तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात तुळजाभवानीच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी आमदार राहुल आवाडे, स्मारक समिती अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी, दिग्पाल लांजेकर, कुंतीलाल पाटनी आणि मोश्मी आवाडे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी तर प्रस्तावना ॲड. समीर मुदगल यांनी केली.
दरम्यान, रविवार ७ रोजी सकाळी धर्मरक्षा यज्ञ तसेच सायंकाळी ५ वाजता एक हजार ढोल-ताशांच्या गजरात महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







