अनुबाई कन्या विद्यामंदिरात ‘क्वीन ऑफ इचलकरंजी – अनुबाईसाहेब घोरपडे’ पुस्तकाचा पुनर्प्रकाशन सोहळा
इचलकरंजी :
अनुबाई कन्या विद्यामंदिर (गावभाग) येथे अनुबाईसाहेब घोरपडे यांच्या जीवनावर आधारित ‘क्वीन ऑफ इचलकरंजी – अनुबाईसाहेब घोरपडे’ या पुस्तकाचा पुनर्प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठानला अनुबाई कन्या विद्यामंदिराची ऐतिहासिक वास्तू भाडे तत्त्वावर खासदार मेघा कुलकर्णी व माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या प्रयत्नातून प्राप्त झाल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास पुस्तकाच्या लेखिका सौ. मोहिनी करकरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच श्रीमंत यशवंतराव घोरपडे (सरकार, इचलकरंजी), माजी आमदार सुरेशराव हाळवणकर,माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे, हिंदुराव शेळके, बाळासो कलागते, श्रीरंग खवरे,गुंडू गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लेखिका सौ. मोहिनी करकरे यांनी आपल्या भाषणातून अनुबाईसाहेबांच्या कर्तृत्वाचा आणि त्यागाचा इतिहास उलगडून सांगितला. माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी अनुबाई कन्या विद्यामंदिराची इमारत पुनरुज्जीवित करण्यासाठी सहकार्य करण्याची घोषणा केली. तसेच माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे यांनी महिलांसाठी क्रांतिकारी व्यवसाय प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात यावा, अशी सूचना केली.युवा व्याख्याते प्रथमेश इंदुलकर यांनी अनुबाईना स्मरण करत स्त्री शक्तीचे महत्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमातून श्रीमंत अनुबाईसाहेबांचे विचार व सामाजिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. यावेळी शिष्यसंवर्धनी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रमा फाटक,सुविद्या लेले,सोनाली माळी,अमृता पिसे,रागिणी पळसुले,सुशिला हळाले,प्रतिभा वठारे,प्रसाद लेले,विनोद शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
मोहिनी करकरे यांचे स्वागत करताना रमा फाटक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







