इचलकरंजीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व विविध कला गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील प्रेरणा परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनादिवशी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसरात देशभक्तीमय व आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी प्रेरणा गल्ली, इचलकरंजी येथे राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. हा ध्वजारोहण सोहळा माननीय श्री. धनंजय बाबुराव जगताप (सिव्हिल अॅडव्होकेट) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
यानंतर सायंकाळी प्रेरणा गल्ली नं. 1 येथे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नृत्य, नाट्य, देशभक्तीपर गीते, समूह नृत्य व सांस्कृतिक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. लहान मुलांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रम रंगतदार ठरला.
सायंकाळच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. उदय चंद्रकांत वनारसे हे होते. मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. ईश्वर दत्तात्रेय पेटकर, उपाध्यक्ष शुभम संजय पिसे, खजिनदार अनिकेत कृष्णा फातले, सेक्रेटरी गजेंद्र हवळ यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते अभिजीत फातले, राहुल पेटकर, नरेंद्र हवळ, राहुल जाधव, अमर माळी, सुनील बडवे, अशोक, यश मुदगल, राजेश रानभरे, काजवे, गुंजन (सुधीर) पिसे तसेच मंडळाचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित बोंगाळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा किशोर नेजे यांनी आखली होती. प्रकाशयोजनेची जबाबदारी सुनील बडवे यांनी सांभाळली. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन शेखर संजय पिसे यांनी यशस्वीरीत्या केले. विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणासाठी कोरिओग्राफर म्हणून स्वप्नाली पेटकर यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमादरम्यान महिला नगरसेवक सौ. वैशाली शशिकांत मोहिते व सौ. सारिका सुकुमार पाटील यांच्या नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल प्रेरणा परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. मंडळाच्या महिला कार्यकर्त्या मीनाक्षी पिसे व स्वप्नाली पेटकर यांच्या हस्ते दोन्ही महिला नगरसेवकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दोन्ही महिला नगरसेवकांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व, महिलांचा सामाजिक सहभाग व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आपले विचार व्यक्त केले.
याच कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू, पॅड तसेच टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले. तसेच सकाळच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर प्रेरणा परिवाराच्या वतीने उपस्थित लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सकाळच्या ध्वजारोहण व सायंकाळच्या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमामुळे परिसरात सकारात्मक, आनंदी व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिक, पालक, विद्यार्थी व पाहुण्यांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.
या यशस्वी आयोजनासाठी प्रेरणा परिवाराच्या सर्व पदाधिकारी, मंडळाचे सदस्य, महिला कार्यकर्त्या, स्वयंसेवक तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे प्रेरणा परिवाराच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व नागरिक, पालकवर्ग, विद्यार्थी तसेच माध्यम प्रतिनिधी यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
प्रेरणा परिवाराच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जात असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
विविध गुणदर्शन कार्यक्रमावेळी प्रेरणा परिवाराचे सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







