इचलकरंजीत खंडणीच्या मागणीवरून कारखान्यावर हल्ला; परस्परविरोधी तक्रारीनंतर दोन गुन्हे दाखल
इचलकरंजी:
इचलकरंजी शहरातील जुना चंदूर रोड परिसरात असलेल्या लायकर ग्रुप टेक्स्टाईल कारखान्यासमोर खंडणीच्या मागणीवरून वाद उफाळून आल्याची गंभीर घटना घडली. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गौरव रणजित लायकर (वय २४, व्यवसाय – टेक्स्टाईल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी कारखान्यासमोर कामगार जितेंद्र कुमार याला आरोपींनी अडवून मोबाईल व पैशांची मागणी केली. मोबाईल न मिळाल्याने शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणी करण्यात आली. त्यानंतर काही आरोपी हातात लाकडी काठ्या घेऊन मोटारसायकलवरून कारखान्यात जबरदस्तीने घुसले व फिर्यादीसह कामगारांवर हल्ला केला. कारखान्यातील यार्न कापून नुकसान केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. या प्रकरणात ९ नामनिर्देशित आरोपींसह २ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच घटनेप्रकरणी अमोल श्रावण कटारे (वय १८, व्यवसाय – मजुरी) यांच्या फिर्यादीवरून ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजता त्यांच्या बहिणीस रुग्णालयातून घरी नेत असताना लायकर टेक्स्टाईल कारखान्याजवळ काही इसम मारहाण करत असल्याचे दिसले. याबाबत विचारणा केल्यावर आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ११ नामनिर्देशित आरोपींसह ५ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







