इचलकरंजीत राष्ट्र सेविका समितीचे शिस्तबद्ध पथसंचलन
इचलकरंजी –
मकर संक्रमण पर्वाच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्र सेविका समितीच्यावतीने आयोजित सेविकांचे शिस्तबद्ध पथसंचलन बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडले. शिस्त, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या पथसंचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
दुपारी मंगलधाम परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिर येथून पथसंचलनास सुरुवात झाली. पोस्ट ऑफिस, बुरुड गल्ली, मोठे तळे, महात्मा गांधी पुतळा, शंभूतीर्थ, फ्रुट लाईन, व्यंकटराव हायस्कूल, मराठे मिल, सुंदर बाग मार्गे पुन्हा पोस्ट ऑफिस असा मार्ग या संचलनासाठी निश्चित करण्यात आला होता. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून सेविकांचे स्वागत केले.
या पथसंचलनात १०० गणवेशधारी सेविकांनी सहभाग घेतला. महिला संघटनशक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रकार्याची जाणीव यांचे दर्शन या माध्यमातून घडले.
पथसंचलनानंतर श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रांत सह बौद्धिक प्रमुख वर्षा चापोरकर यांनी प्रेरणादायी उद्बोधन केले. त्यांनी सेविकांच्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच राष्ट्रघडणीतील योगदानावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी उत्तर कोल्हापूर जिल्हा कार्यवाहिका सौ. गौरी मुजुमदार, प्रांत सेवा प्रमुख सौ. निलिमा भिलवडीकर आणि प्रांत शारीरिक शिक्षण प्रमुख सौ. केतकी प्रभुदेसाई उपस्थित होत्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
पथसंचलनात सहभागी राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







