इचलकरंजीत कान दोष तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर
इचलकरंजी-
येथील इनरव्हील क्लब, रोटरी क्लब सेंट्रल, एन. वाय. फौंडेशन (अजय देवगण पुरस्कृत), इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फौंडेशन, भूतडा असोसिएट (सी.ए. भुतडा) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एओआय विदर्भ, शाखा नागपूर व ग्लोबल इएनटी फौंडेशन यांच्या सहकार्याने इचलकरंजी येथे ‘कानाच्या दोषांचे रोगनिदान आणि उपचार व शस्त्रक्रिया शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. सदरच्या शिबिरामध्ये ऐकू न येणे, (बहिरेपणा), कमी ऐकू येणे, कानात किडे होणे, कानातून पाणी येणे, पू येणे किंवा रक्त येणे, इत्यादी कानदोषांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
सदरच्या शिबिरामध्ये तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रो. डॉ. देवेंद्र माहोरे (जीएमसी नागपूरचे इएनटी विभाग प्रमुख), डॉ. नंदू कोलवाडकर नागपूर (नॅशनल इएनटी असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष), डॉ. समीर चौधरी (इएनटी असोसिएशन ऑफ इंडियाचे ऑनररी सेक्रेटरी), प्रा. डॉ. जीवन वेदी (इएनटी विभाग प्रमुख, आयजीजीएमसी, नागपूर) आणि डॉ. अजय देशपांडे (एओआय विदर्भाचे अध्यक्ष)
हे अनुभवी नाक, कान व घसा तज्ज्ञ सर्जन उपस्थित राहणार आहेत.
शिबिरासाठी प्राथमिक तपासणी आवश्यक असून, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र, नाकोडा नगर, निरामय हॉस्पिटलजवळ, इचलकरंजी येथे तपासणी होणार आहे. मर्यादित संख्येमुळे इच्छुक रुग्णांनी याच ठिकाणी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तपासणीनंतर निवड करण्यात आलेल्या रुग्णांवर दिनांक ६, ७ आणि ८ मार्च २०२६ या कालावधीत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे अत्यल्प खर्चात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तरी इचलकरंजी व परिसरातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यामधील आणि सीमा भागातील इच्छुक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







