ICHMH51NEWS.IN
9921600800

संगीत कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संगीत कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी:
येथे आयोजित करण्यात आलेल्या, हिंदी चित्रपट संगीताच्या अभ्यासक, लेखिका आणि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे, मुंबई यांच्या संगीत कार्यशाळेस रसिकांचा आणि हौशी गायकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “भारतीय कला क्षेत्रातील चित्रपट गीत गायन आणि भावगीत गायन ही अतिशय समृद्ध आणि संपन्न परंपरा असून ती अशीच चालू राहण्यासाठी व्यावसायिक तसेच हौशी गायकांनी सुगम संगीत व शास्त्रीय संगीताचा अभ्यास करणे तसेच गाणे समजून सादर करणे महत्त्वाचे आहे” अशा आशयाचे प्रतिपादन डॉ. मृदुला दाढे यांनी केले.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात डॉ. दाढे पुढे म्हणाल्या “गाणे सादर करताना प्रथम ते मनातून येते आणि मग आवाजातून येते. त्यामुळे गायकांनी आत्मविश्वासाने आणि मनापासून गायन सादरीकरण करावे. अचूक गायनाचे मर्म जाणून घेऊन, समजून गायन केल्यास ते निश्चितपणे उत्तम होईल.” येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय संगीत कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मर्दा फाउंडेशनचे विश्वस्त श्यामसुंदर मर्दा आणि रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी म.सा.प. इचलकरंजीच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे आणि नाट्य परिषदेचे संचालक प्रा. मिलिंद दांडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांच्या हस्ते उदघाटनपर दीप प्रज्वलन करण्यात आले.
सदरच्या कार्यशाळेत डॉ. मृदुला दाढे यांनी सुगम संगीत म्हणजे काय, शास्त्रीय संगीताचे फायदे कोणते, कराओके गाणं म्हणताना कोणती काळजी घ्यावी, आवाजाचा लगाव व श्वास नियंत्रणाचे महत्त्व तसेच ताल आणि भाव प्रकटीकरणात आवाजाची भूमिका, रियाज कशा प्रकारे करावा, माईकवर प्रभावी गायन कसे करावे आणि दोष कसे टाळावेत, इत्यादी विषयांवर दृकश्राव्य पद्धतीने आणि उदाहरणांसह सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात शिबिरार्थीनी विचारलेल्या विविध प्रश्नांना दाढे यांनी उत्तरे दिली. शेवटी दाढे आणि रोटरी प्रांत ३१७०चे सहाय्यक प्रांतपाल गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले. शेवटी प्रा. दांडेकर यांनी आभार व्यक्त केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात झालेल्या या कार्यशाळेस इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर या भागातील शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगीत कार्यशाळा उदघाटन प्रसंगी डॉ. मृदुला दाढे आणि संयोजक पदाधिकारी. 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा