१५ दिवसात शहर कचरामुक्त करा-महापौर उदय धातूंडे
इचलकरंजी-
इचलकरंजी महानगरपालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौर उदय धातुंडे यांनी पदभार स्वीकारताच शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर तातडीने कारवाई सुरू केली आहे. वाढत्या कचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर महापौरांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली.
बैठकीत कचरा संकलनाचे काम पाहणाऱ्या एनडीके कंपनीच्या अधिकाऱ्यांना दैनंदिन कचरा उठावाबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. “इचलकरंजी शहर १५ दिवसांत कचरा मुक्त करण्यासाठी प्रशासन आणि कंत्राटदारांनी जबाबदारीने काम करावे. वेळकाढूपणा किंवा हयगय सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा महापौरांनी दिला.
शहरातील डंपिंग पॉइंटची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. लहान गल्ल्या, गटारे आणि कोपऱ्यांत साचलेला कचरा तातडीने ट्रॅक्टर-ट्रॉली किंवा टेम्पोद्वारे डेपोपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले. आदेशांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
लवकरच सर्व ६५ नगरसेवकांची संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी कचरा फक्त घंटागाडीमध्येच टाकावा, यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. लालनगर परिसरात प्रात्यक्षिक उपक्रम राबवून घंटागाडी वेळेवर येते की नाही याची स्वच्छता निरीक्षकांकडून तपासणी केली जाणार आहे.
महापौर उदय धातुंडे यांनी स्वतःच्या प्रभागातून स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त केला असून प्रशासन, नगरसेवक आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून ‘स्वच्छ इचलकरंजी’चा संकल्प पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एन डी के कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करताना महापौर उदय धातूंडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







