ICHMH51NEWS.IN
9921600800

‘हिंद-दी-चादर’ उपक्रमाचा इचलकरंजीत उत्साहात शुभारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘हिंद-दी-चादर’ उपक्रमाचा इचलकरंजीत उत्साहात शुभारंभ

इचलकरंजी:
 महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी स्मरणार्थ वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त विद्या कदम, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार आणि प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची प्रभावी सुरुवात झाली. शासनाकडून प्राप्त परिपत्रकानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, त्याग, सहिष्णुता व धार्मिक ऐक्याची मूल्ये रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमांतर्गत गुरु तेग बहादुर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभातफेरी, वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच माहितीपर सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी माहितीपत्रके, घोषवाक्ये व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असून शासनाने सुचविलेल्या संकेतस्थळावरील उपक्रमांचे पालन करून शाळांनी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना संबोधित करताना हा कार्यक्रम औपचारिक नसून विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रभक्ती व सामाजिक समरसतेचे संस्कार घडविण्याची संधी असल्याचे नमूद केले. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी २७ फेब्रुवारीपूर्वी सर्व उपक्रम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. उपायुक्त विद्या कदम यांनी समन्वय राखण्यावर भर दिला, तर शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी कार्यक्रमांचे दस्तऐवजीकरण करून छायाचित्रे व अहवाल सादर करण्याचे मार्गदर्शन केले. प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांनी प्रशासकीय मदतीची हमी दिली.
या अनुषंगाने शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट व गीतांचे प्रक्षेपण करण्यात आले, तर शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रभातफेरीचे आयोजन झाले.
महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे ‘हिंद-दी-चादर’ उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा कार्यक्रम प्रभावी पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

प्रभात फेरीत सहभागी विद्यार्थी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा