जपानमध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी सुरु
टोकियो
जपानमध्ये भारत कल्चरल सोसायटी (BCS) या सामाजिक संस्थेकडून गेली पाच वर्षे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम जगभरातील लोकांना समजावा यासाठी ही संस्था आणि संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक अविरत मेहनत घेत आहेत. यावर्षी हा उत्सव २३ फेब्रुवारी २०२६ रोजी टोकियोमधील कामेईदो येथे होत असून कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
“जपानमध्ये ‘हर घर शिवाजी राजे’ अभियान”
यावर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने BCS जपान संस्थेने ‘हर घर शिवाजी राजे’ असा उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देण्यात येणार आहे. जपानमधील प्रत्येक घराच्या देवघरात शिवरायांच्या मूर्तीची पूजा व्हावी आणि महाराजांचे स्मरण सदैव रहावे हाच यामागचा उद्देश आहे. यासाठी सुमारे ३०० मूर्ती भारतातून जपानला मागवल्या आहेत. जपानमधील शिवजयंती उत्सवाला केवळ मराठी लोकांची उपस्थिती नसते, भारतातील इतर राज्याचे जपानमधील नागरिक, जापानी नागरिक सुद्धा उपस्थित असतात. या अनुषंगाने ‘हर घर शिवाजी राजे’ उपक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
शिवजयंतीसाठी पन्हाळगडावरून जपानला शिवज्योत मशाल जाणार
शिवज्योत मशाल ही एक पवित्र ज्योत आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या भावनेचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात गावा-गावात आणि अनेक शहरातही शिवजयंती साजरी करताना जवळपासच्या गड-किल्ल्यावर मशाल प्रज्वलित करून आपल्या गावात आणली जाते. याच परंपरेनुसार BCS जपानचे कार्यकर्तेसुद्धा दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यावर मशाल प्रज्वलित करून जपानमध्ये घेऊन जातात आणि ती शिवजयंतीच्या कार्यक्रमात केंद्रबिंदू ठरते.
भारत कल्चरल सोसायटी (BCS) जपान या सामाजिक संस्थेने जपानमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली आणि गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी जपानमध्ये संस्थेकडून हा उत्सव साजरा केला जातो. जपानमधील या शिवजयंती उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक वेळी महाराष्ट्रातील एका गडावर शिवज्योत मशालीचे विधिवत पूजन करून ती जपानला नेण्यात येते आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी छत्रपती महाराजांच्या मूर्तीबरोबर त्या शिवज्योतीची मंचावर स्थापना केली जाते.
आतापर्यंत गेल्या तीन वर्षात रायगड, शिवनेरी आणि प्रतापगडावरून जपानला शिवज्योत मशाल नेण्यात आली आहे तर यावर्षी पन्हाळगडावरून मशाल नेण्यात येणार आहे. त्या निमित्ताने संस्थेच्या ऋतिक शिंत्रे, अभिजित होगाडे, ईश्वर हनगंडी, गजानन तारळेकर, हर्ष पाटील, गणेश यादव, स्वानंद येरुडकर, पवन कुकडोळी, अमर खोत या जपान आणि भारतातील कार्यकर्त्यांनी पन्हळगडाला भेट देऊन गडावरील छत्रपती शिवरायांच्या मंदिरात मशालीच्या विधिवत पूजा केली. संपूर्ण गडावर मशाल दौड करून ही मशाल पुढे जपानला पाठवण्यात आली आहे.
*भवानी तलवारीची प्रतिकृती ठरणार मुख्य आकर्षण*
जपानमध्ये होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला यंदा एक विशेष तेज प्राप्त होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या भवानी तलवारीची प्रतिकृती भारतातून खास जपानमध्ये आणण्यात आली आहे. या ऐतिहासिक प्रतिकृतीमुळे कार्यक्रमाला एक वेगळेच वैभव लाभणार आहे. सुरक्षित पॅकिंग, विशेष परवानग्या आणि काळजीपूर्वक वाहतूक अशा सर्व प्रक्रियांनंतर भवानी तलवारीची प्रतिकृती जपानमध्ये पोहोचली आहे. कार्यक्रमस्थळी तिचे विशेष प्रदर्शन ठेवण्यात येणार असून, उपस्थितांना महाराजांच्या शौर्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळणार आहे.
भवानी तलवार ही केवळ एक शस्त्र नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, न्याय आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रतीक मानली जाते. ही तलवार हलकी, वळणदार आणि अत्यंत वेगवान प्रहारासाठी ओळखली जाते. युद्धकलेत निपुण असलेल्या महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये याच प्रकारच्या तलवारीचा वापर केला होता. भवानी तलवार महाराजांच्या वैयक्तिक शौर्याशी जोडलेली असल्याने ती आजही मराठी मनात अभिमानाची भावना जागवते. इतिहासकारांच्या मते, भवानी तलवार ही भारतीय युद्धकलेतील एक उत्कृष्ट नमुना असून, तिच्या रचनेत वेग, अचूकता आणि संरक्षण या तिन्ही गोष्टींचा सुंदर समतोल दिसतो.
या प्रतिकृतीचे प्रदर्शन हे जपानमधील भारतीय समुदायासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. भवानी तलवारीची प्रतिकृती पाहताना उपस्थितांना केवळ इतिहासाची आठवण होणार नाही, तर शिवाजी महाराजांनी दिलेले मूल्य – धैर्य, प्रामाणिकपणा, लोककल्याण, शिस्त आणि स्वाभिमान यांचे स्मरणही होईल. ही प्रतिकृती जपानमधील तरुण पिढीलाही स्वराज्याच्या आदर्शांची प्रेरणा देईल.
निखिल मयेकर
BCS जपान शिवजयंती 2026 उत्सव प्रमुख
भारत कल्चरल सोसायटी (BCS) जपान
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800










