वीज सवलत ऑनलाईन नोंदणीतील अडचणींवर तोडगा; ३० एप्रिलपूर्वी फॉर्म भरण्याचे आवाहन
इचलकरंजी :
यंत्रमाग उद्योगासाठी लागू असलेल्या वीज सवलतीच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत उद्भवत असलेल्या तांत्रिक अडचणींबाबत आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीत उद्योजकांना सुलभ पद्धतीने फॉर्म भरता यावा यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस आमदार राहुल आवाडे, प्रधान सचिव सौ. अंशू सिन्हा, उपसचिव श्रीकृष्ण पवार, नागपूरचे आयुक्त संजय दैने, तांत्रिक सहाय्यक आयुक्त गणेश वांडकर, स्वीय सहाय्यक प्रल्हाद रोडे आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी आदी प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यंत्रमाग उद्योगाची वीज सवलत सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र फॉर्म भरताना विविध तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब असोसिएशनने आमदार आवाडे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत पुढील प्रमुख अडचणी मांडण्यात आल्या — युनिट विक्री किंवा नोंदणीकृत घटकाच्या मृत्यूनंतर नाव बदलाची सुविधा नसणे; भाडेकरूच्या बाबतीत फॉर्म मालकाच्या नावाने की भाडेकरूच्या नावाने भरावा याबाबत संभ्रम; वीज बिलावरील जुना पत्ता व उद्यम नोंदणीवरील सध्याचा पत्ता यात तफावत; मागील ६ महिन्यांच्या वीज बिलांची अट; जुने एस.एस.आय. प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याबाबत अस्पष्टता; एकापेक्षा अधिक युनिटसाठी स्वतंत्र मोबाईल व ईमेल देण्याची अट; तसेच कागदपत्र अपलोडसाठी स्वतंत्र टॅब नसणे इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली.
चर्चेनंतर उद्योजकांना सुलभ व सोप्या पद्धतीने फॉर्म भरता येईल, असा सुधारित फॉर्म उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. भाड्याने शेड घेतलेल्या तसेच जुने एस.एस.आय. प्रमाणपत्र असलेल्या लघु व मोठ्या यंत्रमागधारकांना नोंदणी सुलभ होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
२७ एच.पी. पर्यंतच्या यंत्रमागधारकांना मशिनरीबाबत स्वयंघोषणापत्र देता येणार असून २७ एच.पी. पेक्षा जास्त क्षमतेच्या यंत्रमागधारकांना चार्टर्ड इंजिनिअरचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
सर्व पात्र यंत्रमाग उद्योजकांनी ३० एप्रिल २०२६ पूर्वी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनतर्फे लवकरच मार्गदर्शन शिबिर आयोजित करून फॉर्म भरण्यासाठी मदत केली जाणार आहे.
मंत्री संजय सावकारे यांच्यासह बैठकीत आ.राहुल आवाडे,चंद्रकांत पाटील,रफिक खानापुरे, सतीश कोष्टी व अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







