मराठी दिनानिमित्त एकांकिकांना रसिकांची भरभरून दाद
इचलकरंजी-
येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी दिन महोत्सव उपक्रमात पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या ग्वाही आणि घरघर या दोन भिन्न शैलीच्या एकांकिकांना रसिकांची भरभरून दाद मिळाली आणि मराठी दिन उपक्रमाची उत्साहात सुरुवात झाली. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्यावतीने तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी एकांकिका उत्सवाचे उदघाटन प्रमुख पाहुणे नगरसेवक उदयसिंह पाटील तसेच ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मिलिंद दांडेकर आणि अतुल शहा, घनश्याम सावलानी, सतीश पाटील, राजन मुठाणे व समीर गोवंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी पाटील, दांडेकर आणि शहा यांनी मनोगत व्यक्त करताना “मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी अशा प्रकारच्या साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले तसेच वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगितले.” सुरुवातीला स्वागतपर मनोगत सावलानी यांनी केले तर प्रास्ताविक समीर गोवंडे यांनी केले. याप्रसंगी संयोजकांच्या हस्ते पाहुण्यांना व संघ प्रमुखांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार संतोष आबाळे यांनी व्यक्त केले.
उदघाटनानंतर पहिल्या सत्रात देशभक्त रत्नापाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर या संघाने ‘ग्वाही’ ही परिणामकारक एकांकिका सादर केली. राजन खान यांच्या कथेचे पवन ठाकरे यांनी नाट्यरूपांतर केले होते तर विशाल चव्हाण यांनी दिग्दर्शन केले होते. एका बेसावध क्षणी सुखी संसार सुरू असलेली गृहिणी पोस्टमनच्या फसवणुकीला बळी पडते. त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत शेवटी कोर्टाच्या निर्णयातून सुटते आणि ते कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचते अशा आशयाची व आपण आपल्या मनाला फसवू शकत नाही हा संदेश देणारी ही एकांकिका होती. यामध्ये अक्षता बारटक्के, पार्थ पाटणे, अभिषेक हिरेमठस्वामी, अर्पिता गजगेश्वर, महेश चौगुले, हंसिका औंधकर, वेदांत डोंगरे, पियुषा खाडे, अनुष्का चव्हाण, समृद्ध मोरे, गायत्री निवळे, निल देवरुखकर व प्रणाली पाटील या कलाकारांनी सहभाग घेतला. प्रकाश योजना- यश गुरुनीत, पार्श्वसंगीत- प्रतीक भस्मे व साक्षी चरणकर, नेपथ्य- ओंकार वडके व महेश चौगुले, रंगभूषा व वेशभूषा- प्रणाली पाटील व अर्पिता गजगेश्वर यांनी तांत्रिक जबाबदारी सांभाळली.
दुसऱ्या सत्रात सोहन प्रॉडक्शन, कोल्हापूर निर्मित ‘घरघर’ ही कौटुंबिक तसेच विनोदी शैलीमधील एकांकिका सादर करण्यात आली. माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये निवारा म्हणून घराची गरज आहे. पण सध्याच्या जगात सामान्य माणसांसाठी हे केवळ स्वप्न बनलेले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगण्याचा कसा संघर्ष करावा लागतो याची कथा यामध्ये खुसखुशीत शैलीत मांडण्यात आली. लेखन व दिग्दर्शन प्रमोद पुजारी यांचे होते तर प्रकाश योजना श्रेयस सोनार यांची होती. पार्श्वसंगीत व नेपथ्य सोहन चव्हाण यांचे होते. यामध्ये विकास कांबळे, सई जाधव, यश शिंदे आणि अर्जुन पिसाळ यांनी कलाकार म्हणून सहभाग घेतला. उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रभावी अभिनय आणि दर्जेदार सादरीकरणामुळे दोन्ही एकांकिकांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात दाद दिली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सादर झालेल्या उपक्रमात पहिल्या दिवशी शहर व परिसरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घरघर एकांकिकेतील एक प्रसंग
मराठी दिन उपक्रमात एकांकिका उत्सवाचे उदघाटन करताना प्रमुख पाहुणे व संयोजक पदाधिकारी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








